नाशिक – आगामी कुंभमेळ्यास १८ महिन्यांचा कालावधी राहिल्याने कामे वेळेत पूर्ण होतील की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त होत असताना प्रशासनाकडून मात्र ती वेळेतच पूर्ण होतील असा दावा केला जात आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तब्बल २५ हजार कोटींच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कुंभमेळ्याची नियोजित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २०२७ पर्यंतची काल मर्यादा (डेडलाईन) निश्चित करण्यात आली आहे.
नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तपोवनची पाहणी करून साधू-महंतांशी संवाद साधला. विकास कामांना मान्यता दिली जात असून कुंभमेळ्यासाठीची सर्व विकास कामे विहीत वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी पंचमुखी हनुमान मंदिर, दिगंबर आखाडा, लक्ष्मी नारायण मंदिर, तपोवन परिसराला भेट दिली.
कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक, सुरक्षित होईल, असे नियोजन करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. साधू, महंतांच्या अडचणी, समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या साधू- महंतांना आवश्यक सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल. आगामी काळात विविध विकास कामांना गती देत साधू- महंतांशी नियमितपणे संवाद साधला जाईल, असेही डॉ. गेडाम यांनी सांगितले. मनपा आयुक्त खत्री यांनी मनपाने कामांना सुरूवात केल्याचे सांगितले. साधुग्रामच्या जागेची पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. भूसंपादन करताना शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
गोदावरीची स्वच्छता करा
राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. रामकिशोर शास्त्री, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज, रामस्नेहीदास महाराज आदींनी विविध प्रश्न मांडले. गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रवाहित राहील याची दक्षता घ्यावी, नाशिक- त्र्यंबकेश्वर प्रमाणेच कावनई येथे सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, पुरेशी स्वच्छतागृहे असावीत तसेच तपोवनात कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा साधू- महंतांनी व्यक्त केली.
