नाशिक : शहर परिसरात बिबट्यांचा वावर दिवसागणिक वाढत आहे. दोन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू झाल्याने वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत. त्यापैकी मंगळवारी पहाटे माडसांगवी शिवारातील शेतात बिबट्या जेरबंद झाला. त्याला म्हसरूळ येथील उपचार केंद्रात नेण्यात आले. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता वडनेर दुमाला येथील राजपूत कॉलनी परिसरात बिबट्याला बेशुध्द करुन वन विभागाने जेरबंद केले.

माडसांगवी परिसरात काही दिवसांपासून बिबट्यांकडून दुभत्या जनावरांवर हल्ला करण्यात येत आहे. कुत्रीही फस्त करण्यात येत असल्याने शेतांमध्ये राहणाऱ्यांनी सायंकाळीनंतर घराबाहेर पडणे बंद केले आहे. बिबट्याला अडकविण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. तरीही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने वनविभागाने काही पिंजऱ्यांची जागा बदलली. अखेर मंगळवारी पहाटे मंगेश काठे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.

वन विभागाने बिबट्याला सुरक्षितरित्या म्हसरूळ येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी आर्टिलरी सेंटर येथील जवानांच्या वसाहतीत राहणाऱ्या एका जवानाचा दोन वर्षाचा बालक श्रृतीक गंगाधरन याला बिबट्याने उचलून नेले होते. त्याच्या मृत्यूमुळे संतप्त नागरिकांनी बिबट्या जेरबंद करा, अशी मागणी केली होती. वनविभागाने बिबट्याचे मानवी वस्तीवरील वाढते हल्ले पाहता बिबट्याला ठार मारण्याची परवानगी राज्य शासनाकडे केली होती.

आर्टिलरी सेंटर आणि नागरी क्षेत्राच्या सीमेवरील भागात बिबट्या दिसून आल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, नाशिक विभाग पथक, संगमनेर बचाव पथक, आर्टिलरी सेंटरचे अधिकारी आणि जवान अशा एकूण १८० जणांच्या पथकाने अत्यंत बारकाईने नियोजन करत काम सुरू ठेवले. परंतु, परिसरातील घनदाट झाडी, पडीक घरे, तसेच ठिकठिकाणी तुटलेले कुंपण याचा फायदा घेत बिबट्या निसटून गेला. दरम्यान, हे क्षेत्र नो फ्लाय असल्यामुळे थर्मल ड्रोनचा वापर करणे शक्य झाले नाही. बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणानुसार पिंजऱ्यांच्या जागा बदलण्यात आल्या. नव्याने तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. याशिवाय बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी उशी राने वडनेर दुमाला परिसरातील राजपूत कॉलनी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला बेशुध्द करुन जेरबंद करण्यात आले.

पुढील तपासणी तसेच कार्यवाहीसाठी बिबट्यास म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्र येथे नेण्यात आले. याविषयी वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी माहिती दिली. जेरबंद बिबट्या मादी असून साधारणत- तीन ते चार वर्षाचा आहे. या भागातून आतापर्यंत हा चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे.