नाशिक – थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी पुरेसा वेळ आणि सवलतीच्या योजना जाहीर करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ताचे लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ४३९ मिळकतींच्या लिलावासाठी जप्तीची कारवाई हाती घेताच ५० मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिला. आता उर्वरित ३८७ मालमत्तांपैकी पहिल्या टप्प्यात ७२ मिळकतींचा लिलाव दोन ते चार जुलै या कालावधीत करण्यात येणार आहे. उर्वरित ३१५ मालमत्तांचा दुसऱ्या टप्प्यात लिलाव करण्यात येईल.
मालमत्ता कराचा अनेकांकडून नियमितपणे भरणा केला जात नाही. वाढत्या थकबाकीमुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी पुरेसा अवधी दिला गेला. मध्यंतरी थकीत मालमत्ता कराच्या दंडात सवलत देणारी योजनाही राबविली गेली. त्यावेळी प्रत्येक थकबाकीदारास लेखी नोटीस बजावून माफ होणाऱ्या दंडाबाबत पूर्वकल्पना दिली गेली. तरीदेखील मालमत्ता कराचा अनेक थकबाकीदारांनी भरणा केला नाही. अशा थकबाकीदारांना वारंवार प्रत्यक्ष भेटूनही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने ४३९ मालमत्तांवर अखेर जप्तीची कारवाई सुरू केली. २०२४-२५ या वर्षात ४३९ मालमत्ताधारकांना जप्तीचे अधिपत्र बजावले गेले. या मिळकतींचा लिलाव करण्यापूर्वी संबंधितांना सूचना केल्यावर ५० जणांनी प्रतिसाद देऊन थकबाकी भरल्याचे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मिळकती लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात आल्या.
उर्वरित ३८७ पैकी पहिल्या टप्प्यात ७२ मिळकतींचे सरकारी मूल्य निश्चित करण्यात आले. दोन ते चार जुलै या कालावधीत या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सहा विभागीय कार्यालयात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३१५ मिळकतीचा लिलाव होईल. लिलाव प्रक्रियेपूर्वी संपूर्ण थकबाकीचा भरणा केल्यास त्या मिळकती लिलावातून वगळण्यात येतील. जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा मुदतीत भरणा करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी केले आहे.
६०० मिळकतींच्या लिलावाचे नियोजन
साप्ताहिक आढावा बैठकीत थकीत मालमत्ता कराच्या वसुलीबाबत कडक कारवाईचे सुतोवाच झाले होते. पुढील दोन महिन्यात विभागीय स्तरावर प्रत्येकी १०० थकबाकीदार असे सहा विभागीय कार्यालयांतील एकूण ६०० मिळकतीचे लिलाव करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.