नाशिक – नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस सेवा दलास महानगरपालिकेने नाशिकरोड विभागीय कार्यालय परिसरातील हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण करण्यास परवानगी नाकारली. ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे नमूद करीत नाशिक शहर सेवा दलाने परवानगी नाकारल्यानंतरही ठाम भूमिका घेत, हुतात्म्यांना अभिवादन करून राष्ट्रध्वज फडकवला.

नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नाशिकरोड येथील हुतात्मा स्मारक येथे थोर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ध्वजारोहण करण्यात आले. नऊ ऑगस्ट क्रांती दिन हा इंग्रजांना “चले जाव” असा नारा देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी सकाळी नऊ वाजता नाशिकरोड येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करून येथे ध्वजारोहण करण्याचे नियोजन सेवा दलाने केले होते. यासाठी महानगरपालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. मनपा प्रशासनाने ती नाकारली.

या दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमाची रुपरेषा जनसंपर्क विभागाकडून विभागीय कार्यालयास प्राप्त होत असते. परंतु, अशा प्रकारचा कुठलाही आदेश अथवा पत्र प्राप्त नसल्याने शासकीय इमारतीत ध्वजारोहण करण्यास परवानगी देता येणार नाही, असे मनपाने पत्राद्वारे कळवले. मुळात ही परवानगी आम्ही शासकीय कार्यालयात नव्हे तर, हुतात्मा स्मारकावर ध्वजारोहणासाठी मागितली होती, आणि परवानगी नाकारूनही आम्ही स्मारकावर तिरंगा अभिमानाने फडकवला, याकडे शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ.वसंत ठाकूर यांनी लक्ष वेधले. यानंतर देवळाली गाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाचे उपाध्यक्ष सुरेश मारू, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कुसुमताई चव्हाण, सिद्धार्थ गांगुर्डे, सरचिटणीस कामील इनामदार, डॉ. सुरेश पाटील सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासकीय यंत्रणेचा निषेध

एकीकडे केंद्र सरकार हर घर तिरंगा असा नारा देते, तर दुसरीकडे नऊ ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्मा स्मारकावर राष्ट्रध्वज फडकवण्यास परवानगी नाकारली जाते. हे पुन्हा एकदा गुलामीच्या मानसिकतेत वावरण्याचे चित्र दर्शवते. देशाचा तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी जर शासकीय कार्यालये परवानगी देत नसतील, तर अशा प्रशासकीय व्यवस्थेचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे राष्ट्रसेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हवे तर गुन्हे दाखल करा…

महानगरपालिकेने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस सेवा दलाने ठाम भूमिका घेत, हुतात्मा स्मारकावर हुतात्म्यांना अभिवादन करून राष्ट्रध्वज फडकवला. हवे तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, अशी भूमिका आम्ही घेतल्याचे सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी सांगितले.