कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी उमेदवारांची शक्कल

महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण शहरात आता प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. मतदारांनंतर निवडणुकीतील सर्वात प्रमुख घटक असलेल्या कार्यकर्त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी आणि ते आपल्याकडेच राहतील याची दक्षता घेण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे उपाय अमलात येत आहेत. कार्यकर्त्यांना भरपेट जेवण हा तर अलिखित करारच, परंतु त्यापेक्षाही कार्यकर्त्यांना बाटलीचे वेड अधिक असल्याने जो अधिक बाटल्या देईल, त्याच्याकडे कार्यकर्ते अधिक थांबतील असे चित्र आहे. बाटली देऊनही कार्यकर्ते आपल्याकडे थांबतील याची हमी नसल्याने उमेदवार त्यांच्या हातात ‘बूच’ उघडलेली बाटली देत आहेत. या बूच उघडलेल्या बाटलीचे रहस्य आहे तरी काय?

निवडणूक प्रचाराच्या गदारोळात बाटलीला अनन्यसाधारण महत्त्व. कार्यकर्ते हमखास ताब्यात ठेवण्याचे हत्यार म्हणजे बाटली. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही बहुसंख्य उमेदवारांनी हे हत्यार उपसले (नव्हे, उघडले) आहे. दिवसभर प्रचारासह निवडणुकीच्या इतर कामांमध्ये मग्न राहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कुठे मळ्यांमध्ये, कुठे एखाद्या ‘फार्म हाऊस’वर झिंगाट पाटर्य़ा होऊ लागल्या आहेत. कार्यकर्त्यांना जेवणात बोकडाचे मटण किंवा कोंबडी हवीच. याव्यतिरिक्त दुसरा पदार्थ जेवणात दिला तर कार्यकर्ते न जेवताच रागावून उठून जात असल्याचे पंचवटीतील एका उमेदवाराने मान्य केले. इतके करूनही काही कार्यकर्ते ‘चोरावर मोर’ होण्याचा प्रयत्न करतात. जेवण करून, बाटली मात्र घरी घेऊन जाण्याचे प्रकार करतात. हे प्रकार थांबविण्यासाठी उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना बूच उघडूनच बाटली देण्याचा पर्याय पुढे आला. बूच उघडून थेट बाटलीच कार्यकर्त्यांच्या हातात देण्यात आल्यावर उघडलेली बाटली जागीच संपविणे कार्यकर्त्यांना भाग पडते. एकदा का बाटली घशात रिती झाली की पुढील काम अधिक सोपे होते. त्यामुळेच बूच उघडलेली बाटली उमेदवारांच्या अधिक कामाची झाली आहे.

बाटलीसाठी कूपन

म्हसरूळ परिसरातील एका प्रसिद्ध बोकडपालन केंद्राच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून त्यांच्याकडे दररोज किमान दोनशे बोकडांची मागणी होत आहे. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ही मागणी कायम राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. कोंबडी, बोकडाचे मटण तयार करून शिजवून देणाऱ्यांनाही निवडणुकीमुळे सुगीचे दिवस आले असून त्यांची रोजची कमाई किमान पाच ते दहा हजारापर्यंत गेली आहे. बहुतेक उमेदवारांनी शेतामध्येच सर्वकाही पुरविण्याची व्यवस्था केली आहे. उमेदवार स्वत: अशा ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर राहणे टाळत असून कार्यकर्त्यांना जेवणासह बाटलीची व्यवस्था करण्यासाठी कूपन पद्धतही अमलात आणण्यात आली आहे. उमेदवाराच्या विश्वासातील एखाद्या कार्यकर्त्यांकडे जेवण आणि बाटलीचे वेगवेगळे कूपन दिले जातात. कार्यकर्त्यांनी त्याच्याकडून कूपन घ्यायचे आणि ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली असेल त्या ठिकाणी ते कूपन दाखवून जेवण किंवा बाटली घ्यावयाचे अशी ही पद्धत आहे. या पद्धतीमुळे किती कार्यकर्त्यांला किती कूपन वाटले गेले, दररोज किती कूपन लागत आहेत, याची मोजदाद करणे उमेदवाराला शक्य होत आहे.