नाशिक – शहरातील वाहतूक कोंडीत खुद्द मंत्रीही अडकल्यानंतर महापालिकेने या समस्येला कारक ठरलेल्या वाहनतळाचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने अखेर पावले टाकली आहेत. रस्त्यावरील आणि रस्ताबाह्य अशा एकूण २८ वाहनतळांसाठी प्रस्ताव (आरएफपी) मागविले असून ऑगस्टपर्यंत ते कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे, रस्त्यावरील आणि रस्ताबाह्य अर्थात स्वतंत्र तळावर तीनचाकी, चारचाकी वाहनांसाठी निश्चित केलेल्या दरात फारशी तफावत नसल्याने वाहतूक कोंडी कितपत दूर होईल, हा प्रश्न आहे.

आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला लागलेल्या महापालिकेला प्रशासकीय राजवटीत वाहतूक कोंडीची समस्या सोडविता आलेली नाही. वाहनतळ नसल्याने रस्त्यावर अस्त्याव्यस्त वाहने उभी केली जातात. परिणामी लहान-मोठे रस्ते आणि चौक कोंडीच्या गराड्यात सापडतात. अन्य वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे ठरते. त्यात पावसाळ्यातील खड्डे, पाण्याची भर पडली आहे.

मध्यंतरी उद्योग व शिक्षणमंत्री वाहतूक कोंडीत सापडले होते. तसेच द्वारका आणि मुंबई नाक्यातील अतिक्रमणे व कोंडीवरून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. वाहनतळांअभावी सर्वत्र कोंडीच कोंडी असे चित्र आहे. या स्थितीत प्रदीर्घ काळापासून रखडलेला वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावण्याची पुन्हा तयारी सुरू आहे.

२२ रस्त्यांवरील तर सहा रस्ताबाह्य स्वतंत्र वाहनतळांसाठी प्रस्ताव दाखल करण्याची १० जुलै अंतिम तारीख असून दुसऱ्या दिवशी ते उघडले जातील. स्मार्ट सिटी कंपनी पैसे देऊन वाहनतळ कार्यान्वित करण्यास अपयशी ठरली. राजकीय पातळीवर त्यास विरोध झाला होता. आता उपरोक्त वाहनतळांसाठी शुल्कही निश्चित करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकट वाहनतळासाठी शुल्क निश्चिती

रस्त्यावरील वाहनतळावर दुचाकी वाहन उभे करण्यासाठी दुचाकीला १० रुपये (दोन तास), २० रुपये (दोन ते सहा तास), ४० रुपये (सहा ते १२ तास) आणि ६० रुपये (१२ ते २४ तास) मोजावे लागतील. तीनचाकी व चारचाकी वाहनांना दर अनुक्रमे २० रुपये, ४०, ८० व १०० रुपये असतील. रस्ताबाह्य वाहनतळावर दुचाकी वाहनांना (सहा ते १२ तास) ३० रुपये लागतील. १२ ते २४ तासासाठी याच ठिकाणी ते तुलनेत कमी म्हणजे ४० रुपये असतील. बाह्य वाहनतळावर तीन चाकी व चारचाकी वाहनांना अनुक्रमे २०, ५०, १०० व २०० रुपये शुल्क आकारले जाईल.