राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार वाढीव किमान वेतन फरकासह मिळावे आणि महापालिका आरोग्य विभागाकडे ठेकेदाराच्या आडमुठय़ा धोरणामुळे अडकलेल्या वेतनाच्या मुद्दय़ावरून गुरुवारी घंटागाडी कामगारांनी पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. याबाबत आयुक्तांशी चर्चा झाली. मात्र ती निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
शासनाने दिलेल्या अधिसूचनेत किमान मूळ वेतनाचे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार घंटागाडी कामगारांना परिमंडळ -१ अंतर्गत मासिक किमान मूळ वेतन ११ हजार ५०० रुपये प्रतिमहिना आणि निश्चित केलेला विशेष भत्ता ठेकेदारांना अदा करावा लागणार आहे. या अनुषंगाने कामगार उपायुक्तांनी पालिकेला सूचना दिली आहे.
मात्र अद्याप घंटागाडी कामगारांना किमान मूळ वेतन आणि त्यावरील विशेष भत्ता मागील फरकासह देण्यात आलेला नाही. आरोग्य विभागाने घंटागाडी ठेकेदार मे. वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स, मे. विशाल सव्‍‌र्हिसेस, मे. समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सय्यद असिफ अली यांना पत्र देऊन त्याची अंमलबजावणी १० ऑक्टोबरपूर्वी करावी, असे आदेश दिले.
मात्र १४ ऑक्टोबपर्यंत ही वेतन तसेच फरकाची रक्कम बँक खात्यात जमा न झाल्याने मनपा श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे आणि अन्य घंटागाडी कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेत चर्चा केली. आयुक्तांनी त्यातील कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र श्रमिक संघाचे समाधान झाले नसून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा श्रमिक संघाने दिला आहे.