नाशिक – अमृत (दोन) अंतर्गत शहरात सुमारे २८४ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेसाठी कार्यारंभ आदेश देण्यास महानगरपालिका स्थायी समितीने मान्यता दिली. या अंतर्गत गावठाण भागातील २५० किलोमीटर जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येतील. तसेच नववसाहतींसाठी सुमारे १०० किलोमीटरच्या नवीन जल वाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे गावठाण भागासह नव्याने आकारास आलेल्या वसाहतींतील पाणी पुरवठ्यातील समस्या दूर होण्यास हातभार लागणार आहे.

शहराची वाढती लोकसंख्या आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या अमृत (दोन) अभियानात महापालिका २८४ कोटींची पाणी पुरवठा योजना राबवित आहे. यात नव्याने विकसित झालेल्या भागात जल वाहिन्यांची व्यवस्था आणि गावठाण भागातील जुन्या जलवाहिन्या बदलून अधिक क्षमतेच्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचा अंतर्भाव आहे. तसेच जुन्या जलकुंभांची दुरुस्ती आणि नवीन जलकुंभाची बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी चारवेळा निविदा प्रक्रिया राबवूनही एकही ठेकेदार पात्र ठरला नव्हता. पाचव्यांदा अनुभवाच्या अटीत बदल करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्राकलन दराच्या १० टक्के कमी दराने प्राप्त झालेल्या सोलापूरच्या ठेकेदाराला कार्यारंभ देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे सांगितले जाते

रस्त्यांचे पुन्हा खोदकाम

पाणी पुरवठा योजनेच्या कामांसाठी दोन वर्षांची मुदत आहे. आगामी कुंभमेळा दोन वर्षांंवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी रस्त्यांचे नुतनीकरण होईल. पाणी पुरवठा योजनेच्या कामांसाठी ३५० किलोमीटरचे रस्ते खोदावे लागणार आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. कुंभमेळ्यात रस्त्यांचे नुतनीकरण होण्यापूर्वी जल वाहिनीची कामे मार्गी लागावी, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

गावठाणसह नववसाहतींनाही लाभ

या योजनेत गावठाण भागातील सुमारे २५० किलोमीटरच्या जुन्या जलवाहिन्या बदलून जादा क्षमतेच्या नवीन जलवाहिन्या टाकल्या जातील. त्यामुळे अनेक भागात भेडसावणारी कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागेल. पंचवटी, सि़डको, नाशिकरोड आणि सातपूर भागात निवासी वसाहतींंचा विस्तार होत आहे. या भागात जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिशेबबाह्य पाणी कमी होणार

शहरातील पाणी पुरवठ्यात सुमारे ४५ टक्के हिशेबबाह्य पाणी आहे. गळती, चोरी वा तत्सम कारणांस्तव त्याचा महसूल मिळत नाही. जु्न्या जलवाहिन्या बदलल्याने पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा होईल. हिशेबबाह्य पाण्याचे प्रमाण किमान २० टक्क्यांनी कमी होऊन मनपाच्या पाणीपट्टीच्या उत्पन्नात भर पडण्याचा अंदाज आहे.