नाशिक – सुवर्ण त्रिकोणातील एक कोन म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा भौगोलिक स्थान, मुंबईशी जवळीक, हवामान, मुबलक पाणी आणि दळणवळण सुविधांमुळे विकासाच्या वाटेवर आश्वासकपणे वाटचाल करीत आहे. गोदावरीच्या काठावर दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे पायाभूत सुविधा विस्तारण्यास मदत होते. कृषी, उद्योग, वाइन निर्मिती, पर्यटन, लढाऊ विमानांची बांधणी अशा बहुविध क्षेत्रातील धवल कामगिरी नाशिकच्या अर्थकारणाला गती देत आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उगम पावणाऱ्या गोदावरीच्या काठावर वसलेले नाशिक पूर्वापार तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या या जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जंन्यमान ९१५.९ मिलीमीटर इतके आहे. या भागातील नद्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व नद्या जिल्ह्यातच उगम पावतात. राज्यातील अनेक भागांची तहान भागविण्याची जबाबदारी नाशिकमधील धरणे अव्याहतपणे निभावत आहेत. जलसमृद्धीने कृषी क्षेत्राबरोबर अनेक उद्योग-व्यवसायांची भरभराट झाली. धार्मिक पर्यटनापाठोपाठ वाइन आणि आता वैद्यकीय पर्यटनातही नाशिक पुढे येत आहे. महामार्गांचा विस्तार, रेल्वेद्वारे देशभरात संलग्नता, हवाई नकाशावर बळकट होणारे स्थान या दळणवळण सुविधांनी सर्व क्षेत्राला उभारी मिळाली. द्राक्ष, डाळिंब, कांदा आणि काहीअंशी भाजीपाला यावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. नाशिकचे २०२३-२४ वर्षात दरडोई निव्वळ जिल्हा उत्पन्न दोन लाख ४९ हजार रुपये आहे. जिल्ह्यात १५.७८ लाख वीज जोडण्या असून विजेचा दरडोई वापर ९८०.२८ किलोवाॅट तास इतका आहे.
दोन लाखहून अधिक उद्योग आधार
राज्यातील प्रमुख शहरांची औद्योगिक क्षमता पूर्ण झाल्यानंतर नाशिकच्या औद्योगिकरणास चालना मिळाली. आज वाहन आणि इलेक्ट्रिक उद्योगांचे हे केंद्र बनले आहे. जवळपास ३० मोठे उद्योग या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना विविध सुटे भाग पुरविणाऱ्या लहान उद्योग घटकांची साखळी तयार झाली आहे. जिल्ह्यात १९१० कारखाने नोंदणीकृत असून यातील १७१२ सुरू आहेत. यात एक लाख ३९ हजार ८७४ कामगार काम करीत आहेत. शिवाय, उद्योग आधार असणारे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांची संख्या दोन लाखहून अधिक आहे. त्यामध्ये १५ हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक झाली आहे.
अन्य बँकांवर वित्त पुरवठ्याचा भार
सलग पाच वर्षांपासून स्थानिक बँकांच्या कर्ज मर्यादेत वाढ होत असताना दुसरीकडे कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र थकीत कर्जामुळे अडचणीत आल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत आहे. परिणामी, अन्य बँकांवर कृषी क्षेत्रास पत पुरवठ्याचा भार वाढत आहे. जिल्ह्यात २१३ वर्गीकृत बँकांची ४४१ गाव आणि शहरात ८६२ शाखा कार्यालये आहेत. या बँकांनी २०२३-२४ वर्षात कृषकसाठी ११ हजार ७२५ कोटी आणि अकृषक क्षेत्रात २५ हजार ८८९ कोटींचे कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यात कर्ज-ठेवीचे प्रमाण ७५.९ टक्के आहे. . प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत दोन लाख १७ हजार चार लाभार्थ्यांना जवळपास १७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. तर प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत २३ लाख ६१ हजार ४१ बँक खाती उघडण्यात आली. ८३९१ सहकारी संस्थांपैकी २९०२ संस्था तोट्यात आहेत.
शाळेत मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक
जिल्ह्यात प्रति १० चौरस किलोमीटरमागे चार अशी शाळेची घनता आहे. २०२३-२४ वर्षात जिल्ह्यात एकूण ५३९१ प्राथमिक, तर १७७१ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून महाविद्यालयांची संख्या १२९ आहे. माध्यमिक स्तरावर ६.६ तर उच्च माध्यमिक स्तरावर १.५ टक्के विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले. मुलांपेक्षा मुलींचे गळतीचे प्रमाण अधिक आहे.