नाशिक – श्रावण, चातुर्मास आणि जोडीला दक्षिणेकडील राज्यातील आवक यामुळे देशांतर्गत बाजारात नाशिकच्या कांद्याची मागणी घटली. बांगलादेशने निर्यातीचे दरवाजे उघडल्याने नवीन संधी उपलब्ध झाली. परंतु, ती साधण्यास काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. कारण बांगलादेशने काही विशिष्ट प्रमाणातच आयातीस परवानगी दिल्याचे सांगितले जाते. तसेच तेथील शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठविलेला कांदा काही प्रमाणात शिल्लक आहे. तो संपल्यानंतर भारतीय कांद्याच्या निर्यातीला गती येण्याची आशा निर्यातदार बाळगून आहेत.

उन्हाळ कांदा दरात पाच महिन्यांपासून चढ-उताराची मालिका सुरू आहे. परंतु, हे दर सरासरी किमान एक हजार ते कमाल दीड हजार या दरम्यान सिमित राहिले होते. जूनमध्ये दीड हजार रुपयांवर गेलेले दर जुलैमध्ये पुन्हा खाली आले. बांगलादेशकडून आयातीवर बंदी, श्रावण, चातुर्मासात अनेकांकडून कांदा वर्ज्य केला गेला असताना दक्षिणेडील राज्यातून स्थानिक कांदा बाजारात येऊ लागला. साहजिकच याची परिणती नाशिकच्या कांद्याची मागणी घटण्यात झाली. आता बांगलादेशने काही विशिष्ट मर्यादेत आयातीला परवानगी दिल्याचे सकारात्मक परिणाम स्थानिक बाजारपेठेत दिसू लागले आहेत. या निर्णयानंतर कांद्याचे प्रतिक्विंटलचे सरासरी दर २०० ते ३०० रुपयांनी उंचावले. सोमवारी लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात प्रतिक्विंटलला सरासरी १६०० रुपये दर मिळाले. या हंगामातील हा सर्वोच्च दर आहे.

बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारत दरवर्षी जेवढा एकूण कांदा निर्यात करतो, त्यातील २० टक्के कांदा एकट्या बांगलादेशमध्ये जातो, असे भारतीय फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले. या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्यामुळे फेब्रुवारीपासून निर्यातीत अडचणी आल्या होत्या. नंतर कांद्याची आयात त्यांच्याकडून थांबविली गेली. आता कांदा संपुष्टात येऊ लागल्याने बांंगलादेशने आयातीला परवानगी दिली असली तरी निर्यात वेग पकडण्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. बांगलादेशमधील व्यापारी आणि काही शेतकऱ्यांकडे अद्याप थोडाफार माल साठविलेला आहे. आयातीवर काही मर्यादा घातली गेली का, याची स्पष्टता लवकरच होईल, असे सिंग यांनी नमूद केले.

बांगलादेशसह आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याशी स्पर्धा करावी लागते. नाशिकच्या कांद्याचे दर दक्षिणेकडील राज्यातील पाऊस आणि निर्यातीवर अवलंबून आहेत. बांगलादेशने उशिराने आयात खुली केल्याने दरवर्षी इतकी भारतीय कांद्याची निर्यात तिथे होणार नसल्याचे निर्यातदार सांगतात.