लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: काही महिन्यांपासून हिंसाचार आणि अत्याचारांनी संपूर्ण देशभर गाजत असलेल्या मणिपूरमध्ये प्रथमच मनमाड रेल्वे स्थानकातून पाठविण्यात आलेल्या कांद्याची मालगाडी त्या राज्यातील खोंगसोंग रेल्वे स्थानकात दाखल झाली. त्यामुळे तेथील जनतेला सुखद दिलासा मिळाला.

मनमाड रेल्वे स्थानकालगतच्या अंकाई स्थानकात असलेल्या रेल्वेच्या माल धक्यावरून मणिपूरसाठी मालगाडीद्वारे कांदा पाठविण्यात आला. अंकाई स्थानकातून कांदा भरून निघालेली ही मालगाडी २८०१ किलोमीटरचे अंतर कापत सोमवारी दुपारी चार वाजता मणिपूर राज्यातील खोंगसोंग रेल्वे स्थानकात सशस्त्र पोलीस बंदोबस्तात दाखल झाली. मुख्य म्हणजे या घटनेची दखल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही घेतली. प्रथमच ईशान्य रेल्वेत मिश्र माल वाहतूक जिवनावश्यक वस्तू यात बटाटा, तांदुळ, साखर, कांदा आणि इतर खाद्य पदार्थ घेऊन ही रेल्वे मणिपूर येथे दाखल झाली. देशात सर्वदूर जिवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्द असल्याची ग्वाही या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने दिली.

आणखी वाचा-नाशिकरोडमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याची वरात, मोक्कांतर्गत कारवाईचे निर्देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपलब्धीमुळे मनमाडचा कांदा मणिपूरच्या बाजारपेठेत पोहचला आहे. नाशिक जिल्हा हे कांद्याचे आगार मानले जाते. राज्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन या ठिकाणी होते. नाशिक, पिंपळगाव बसवंत, निफाड, लासलगाव, मनमाड, येवला, नांदगाव, उमराणे, चांदवड येथील बाजारपेठांमध्ये वर्षभर कांद्याची आवक होते. जिल्ह्यात उत्पादित होणारा कांदा रेल्वेद्वारे मनमाड स्थानकातून परराज्यात पाठविला जातो. प्रामुख्याने उत्तर भारत आणि पश्चिम बंगालमध्ये हा कांदा मोठ्या प्रमाणात जात असतो. पण यंदा रेल्वेने ईशान्य भारतात मालगाडीद्वारे कांदा पाठविण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपासून दंगलीमुळे धगधगत असलेल्या मणिपूर राज्यात नाशिकचा कांदा दाखल झाला.