नाशिक – कुप्रसिध्द गुंडांकडून नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतल्यानंतर शहरात प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून भाईगिरी करणाऱ्या रिक्षा चालकांना पोलीसांनी आता लक्ष्य केले आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीसांच्या या कारवाईत २५ लाखापेक्षा अधिक रकमेचा दंड जमा होणार असला तरी रिक्षा चालकांची मुजोरी, बेमुर्वतपण कायम आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील रविवार कारंजा, शालीमार, सिडको, सातपूर यासह वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रिक्षा आहेत. गजबजलेल्या भागातून मार्ग काढत असतांना रिक्षा चालकांकडून बऱ्याचदा वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. गणवेश नसणे, बिल्ला नसणे याशिवाय अतीवेग, वाहनाची दुरावस्था यासह वेगवेगळ्या घटनांमध्ये नियमांचे उल्लंघन होते.
काही दिवसांपूर्वी महिला प्रवाश्याशी हुज्जत घालत रिक्षा चालकाने त्यांच्यावर हात उचलला. याशिवाय सुट्या पैशावरून वाद होत राहतात. बऱ्याचदा रिक्षा चालकांसाठी थांबे देऊनही रिक्षा चालक वेगवेगळ्या ठिकाणी कधी मुख्य रस्त्यावर आपल्या रिक्षा उभ्या करतात. रिक्षा चालकाच्या मनमानी कारभारा विरोधात वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली. यामध्ये एक नोव्हेंबरपासून १७ नोव्हेंबरपर्यंत एकूण ३,६४४ चलान प्रकरणे नोंदवण्यात आली असून, त्यामधून २५ लाख १८,७०० रुपये दंड स्वरुपात मिळणार आहेत.
रिक्षा चालकांना गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. याशिवाय बिल्ला लावलेला हवा. याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू असली तरी रिक्षा चालकांची मुजोरी कायम आहे. रस्ता सुरक्षा आणि वाहतूक विभाग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ही कारवाई सुरू राहील, असा इशारा वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
