नाशिक : नाशिक पोलीस दलाच्या वतीने मंगळवारी परिमंडळ (दोन) अंतर्गत ३३ तक्रारदारांना चोरीस गेलेला पाच कोटी सात लाख ७२ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरूध्दच्या गुन्ह्यातील जास्तीजास्त मुद्देमाल जप्त करत तक्रारदारांना सन्मानाने परत करण्याचे आदेश दिले आहेत.
परिमंडळ दोन अंतर्गत उपायुक्त मोनिका राऊत यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाण्याकडील मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी यांची नेमणूक करत प्रत्येक महिन्याच्या अखेरीस जास्तीजास्त मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्याचे निर्देश दिले.
या अनुषंगाने सातपूर, अंबड, इंदिरानगर , उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्याकडील १७ दुचाकी, चार रिक्षा, एक जेसीबी, २१४. १९० ग्रॅम सोने, दोन मालवाहू वाहने, दोन भ्रमणध्वनी असा पाच कोटी सात लाख ७२ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला.चोरीस गेलेला माल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, पुढील काळात मालाविरूध्दच्या गुन्ह्यातील जास्तीजास्त मुद्देमाल परत मिळविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पोलीस उपायुक्त राऊत यांनी दिले.