मोटारसायकलेच कागदपत्र नंतर देतो, असे सांगून ग्रामीण भागात चोरीच्या मोटारसायकली अत्यल्प किंमतीत शेतकऱ्यांना विकल्याचे उघड झाले आहे. या पध्दतीने संशयितांनी विकलेल्या पाच लाखहून अधिक किंमतीच्या १९ मोटारसायकली आणि तीन सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. देवळाली कॅम्प पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

मागील काही वर्षांत शहरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले आहेत. हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वेळोवेळी संबंधितांना दिले आहेत. त्या अनुषंगाने उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव आणि पथकाने ही कामगिरी करीत चोरीच्या १९ मोटारसायकली शोधून काढल्या.

हेही वाचा >>> सत्तासंघर्षाच्या निकालाविषयी मुख्यमंत्र्यांकडून सर्वांना शुभेच्छा

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या किरण गांगुर्डे (चुंचाळे) याच्याकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस फरार संशयित तुषार उर्फ बाळ्या गायकवाड (१९, डाळी, ओरंगपुरा, निफाड) याचा शोध घेत होते. याच सुमारास संशयित सायखेडा येथील भेंडाळी रस्त्यावरील एका लॉन्सवर येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे सापळा रचून संशयित गायकवाडला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संशयित किरण गांगुर्डेकडून दोन वर्षात चोरीच्या मोटारसायकली विकत घेऊन त्या भेंडाळी, चापडगाव, निफाड आणि दिंडोरी परिसरात विकल्याची कबुली दिली. या आधारे तपास पथकाने उपरोक्त ठिकाणी जाऊन संशयिताने विकलेल्या १० मोटारसायकली ताब्यात घेतल्या. पहिल्या संशयिताकडून नऊ मोटारसायकली आणि तीन सायकली जप्त करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा >>> कोंबड्यांवर विष प्रयोग? कळवणमध्ये ४०० पक्षी मृत्यूमुखी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयित किरण गांगुर्डे आणि त्याचा साथीदार गौरव लहामटे (२४, टाकेद बुद्रुक, इगतपुरी) तसेच अल्पवयीन बालक यांनी चुंचाळे व अंबड परिसरातून वेळोवेळी मोटार सायकलींची चोरी करीत आतापर्यंत पाच लाख, एक हजार रुपयांच्या १९ मोटारसायकली आणि तीन सायकली संशयित गायकवाडला विकल्याचे उघड झाले आहे. नंतर त्याने या मोटारसायकली विविध गावातील शेतकऱ्यांना विकल्या. अतिशय कमी किंमतीत संशयित मोटारसायकल विकत असे. गाडीची कागदपत्रे नंतर देण्यात येतील, असे खोटे सांगून तो व्यवहार करत होता. या गुन्ह्यात गौरव लहामटेला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तुषार उर्फ गायकवाडला अटक करण्याची कारवाई सुरू करण्यात आल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी देवळाली कॅम्प पोलिसांचे कौतुक केले.