नाशिक – राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांकडून धाक दाखवत जमिनी बळकावणे, अतिक्रमण, खासगी सावकारीचे उद्योग कसे सुरू होते, यावर पोलिसी कारवाईतून प्रकाश पडत आहे.

गोळीबार प्रकरणी अटकेत असलेला रिपाइंचा पदाधिकारी प्रकाश लोंढे, मुलगा दीपक लोंढे यांच्यासह १० ते १२ जणांनी बंदूक रोखून सिन्नर तालुक्यातील पाच हेक्टर जमीन हडपल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे, दसक पंचक शिवारातील दोन हेक्टर २० आर जमिनीचा कायदेशीर व्यवहार न करता इतरांना परस्पर विक्री करीत एक कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा माजी नगरसेवक पवन पवार याच्यासह सात साथीदारांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ्देश दिल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली. सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक आणि अन्य साथीदारांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूषण लोंढे अद्याप फरार आहे. लोंढे टोळीवर सातपूर भागात जमीन मालकाकडे जमीन स्वरुपात खंडणी मागितल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल आहे.

आता सिन्नर तालुक्यातील जमीन प्रकरणी दीपक लोंढे, प्रकाश लोंढे, प्रमोद आव्हाड, गणेश आडके आणि इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मच्छिंद्र बोडके (४०, मोहगाव, चिंचोली, सिन्नर) यांनी तक्रार दिली. संशयितांनी तक्रारदाराच्या नातेवाईकांवर बंदूक रोखून सर्वांना सिन्नर येथील उपनिबंधक कार्यालयात नेले. मोहगाव येथील शेतजमीन बळजबरीने त्यांच्या लाभात लिहून घेतली. नंतर सातपूर आयटीआय येथील लोंढेच्या कार्यालयात डांबून ठेवले. खरेदीनंतर जमीन परत करण्याच्या मोबदल्यात तीन कोटींची मागणी केली. जिवे मारण्याची धमकी दिली. दीड कोटी रुपये घेऊनही जमीन नावावर केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दसक शिवारातील शेतजमीन कायदेशीर व्यवहार न करता संशयितांनी बेकादेशीरपणे हस्तांतरीत केली. शेतजमिनीवर अवैध कब्जा करून बनावट कागदपत्र तयार करून नागरिकांकडून पैसे घेऊन हस्तांतरीत केल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा माजी नगरसेवक पवन पवार याच्यासह प्रशांत घोडेराव, जयदीश गांगुर्डे, विशाल पवार, विलासराव गायकवाड, रवी पगारे, विलास लोखंडे आणि साथीदार यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवराज गांगुर्डे यांनी तक्रार दिली.

बळकावलेली जमीन खाली करून दे्ण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यास नकार दिला असता संशयितांनी जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याआधी माजी नगरसेवक पवन पवारविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.