नाशिक – मुंबई सायबर क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे भासवत सायबर भामट्यांनी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात अटकेची भीती दाखवत शहरातील दोघांना तब्बल दीड कोटी रुपयांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधितांनी पोलिसांकडे धाव घेतली. गेल्या पंधरवड्यात सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मुंबई सायबर क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे संशयितांनी सांगितले, वेगवेगळे भ्रमणध्वनी क्रमांक, व्हॉटसॲप कॉल आणि चॅटींगच्या माध्यमातून अटक होण्याची भीती दाखवली.

नरेश गोयल याच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात त्यांचा थेट सहभाग असल्याचे भासवले. त्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकाचा दाखला दिला गेला. त्यामुळे तुमचे आर्थिक तपशील तसेच स्थावर मालमत्ता यांची माहिती आम्हाला द्यावी लागेल, असे सांगून संशयितांनी संबधितांच्या बँक खात्यांत जमा असलेली रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये ऑनलाईन वर्ग करण्यास भाग पाडले.

संशयितांनी सांगितल्याप्रमाणे या घटनेत एका तक्रारदाराने एक कोटी १३ लाख ३० हजार रुपये तर दुसऱ्या तक्रारदाराने ३३ लाख रुपये वर्ग केले. या दोघांची एक कोटी ४६ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालमोटारीतून ४०० लिटर डिझेलची चोरी

महामार्गावर आडगाव शिवारात माल वाहतूक कंपनीच्या आवारात उभ्या असलेल्या दोन मालमोटारीतून सुमारे ४०० लिटर डिझेल चोरण्यात आले. याबाबत संतोष भागवत (कलानगर, दिंडोरीरोड) यांनी तक्रार दिली. भागवत आणि चंदू यादव यांच्या मालमोटारी सोमवारी रात्री आडगाव शिवारातील राजस्थान गुजरात ट्रान्सपोर्ट येथे उभ्या केलेल्या होत्या. पहाटे सहा ते सात जणांच्या टोळक्याने दोन्ही मालमोटारींमधील सुमारे ३६ हजार रुपयांचे डिझेल चोरून नेले. घटनास्थळी बेवारस मोटार आढळली. याच वाहनातून चोरटे आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संमोहित करुन दागिने लंपास

बसची प्रतिक्षा करणाऱ्या महिलेला संमोहित करून भामट्या महिलेने ५४ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार नाशिकरोड भागात घडला. याबाबत अंबड लिंक रस्ता येथील सुमन दातीर यांनी तक्रार दिली. दातीर या २४ जुलै रोजी नाशिकरोड भागात गेल्या होत्या. सायंकाळी त्या परतीच्या प्रवासासाठी शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आनंद लाँड्री भागात बसची वाट पाहत थांबल्या होत्या. यावेळी सलवार कुर्ता परिधान केलेल्या एका महिलेने त्यांना बोलण्यात गुंतवून संमोहित केले. दातीर यांना मंगळसूत्र, पोत, कर्णफुले असे सुमारे ५४ हजार रुपयांचे दागिने काढण्यास भाग पाडले. दागिने हाती पडताच महिलेने पलायन केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळसूत्र खेचले

शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र कायम असून गंगापूर रस्त्यावरील के.बी.टी. चौक परिसरात पादचारी महिलेचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचून नेले. याबाबत अश्विनी सूर्यवंशी (सदगुरू अपार्टमेंट) यांनी तक्रार दिली. १३ जुलै रोजी ही घटना घडली. सूर्यवंशी जेवण झाल्यानंतर रात्री फेरफटका मारण्यासाठी चौकातील जॉगिंग ट्रॅकवर गेल्या होत्या. रस्त्याने जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.