नाशिक – शहर परिसरात समाधानकारक पाऊस होत असतानाही टाकळी परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करावे लागले. रहिवाशांना भेडसावणाऱ्या कृत्रिम पाणी टंचाईच्या समस्येला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. शहरातील प्रभाग २६, २८, ३०, ३१ मध्ये काही महिन्यांपासून पाणी टंचाई जाणवत आहे. रहिवाशांनी याप्रकरणी आंदोलनेही केली. अंबड परिसरातही अधूनमधून टंचाई जाणवते. आता प्रभाग क्रमांक १६ मध्येही पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
प्रभागातील गांधीनगर येथे चार जलकुंभ आहेत. त्यापैकी एक आणि चार क्रमांकातील कुंभातून समतानगर, आगरटाकळी, वैदुवाडी, आदिवासी वसाहत, रामदास स्वामी मठ परिसरासह इतर भागात पाणीपुरवठ्याचे नियोजन असते. परंतु, काही तांत्रिक बाबींमुळे समतानगर, आगरटाकळी, वैदुवाडी, रामदास स्वामी मठ, आदिवासी वसाहत, उतरानगर, साईशिव नगर, मंगलमूर्ती नगर, स्प्रिंग व्हॅली या ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या कृत्रिम टंचाईकडे महिलांनी हंडे डोक्यावर घेत लक्ष वेधले. याशिवाय परिसरातील इतर समस्याही निवेदनात मांडण्यात आल्या.
प्रभाग क्रमांक १६ मधील नाशिक रोडकडून टाकळीकडे जाणाऱ्या ३० मीटर मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नाशिकरोड तसेच छत्रपती संभाजीनगर रस्त्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे सातत्याने अपघात होत असतात. खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करुनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.