नाशिक – महापारेषण कंपनीकडील एकलहरे वीज केंद्रातील विविध देखभाल व दुरूस्ती कामांकरिता रविवारी सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे. तसेच स्मार्ट सिटी कंपनीकडून जलशुध्दीकरण केंद्राच्या आवारात विविध ठिकाणी प्रवाह मीटर बसविण्याची कामे यामुळे नाशिकरोड विभागातील सहा प्रभागात रविवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

महानगरपालिकेच्या नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र व चेहेडी पंपिंग स्टेशन येथील उच्च क्षमतेचा विद्युत पुरवठा एकलहरे वीज केंद्रातून घेण्यात आलेला आहे. महापारेषण कंपनीकडील एकलहरे वीज केंद्रात रविवारी विविध देखभाल व दुरूस्तीच्या कामांसाठी सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याचे मनपास कळविण्यात आलेले आहे. तसेच नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे जलशुध्दीकरण केंद्रांच्या आवारात विविध ठिकाणी प्रवाह मीटर अर्थात फ्लो मीटर बसविण्याची कामे केली जाणार आहे.

नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याने या कालावधीत नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथून पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. १७ मधील चाडेगांव, एकलहरा रोड, सिन्नर फाटा, गोरेवाडी, चेहेडी गांव, चेहेडी पंपिंग रोड परिसर, सामनगांव रोड, ओढा रोड, प्रभाग क्रमांक १९ मधील कॅनॉल रोड, चंपानगरी परिसर, शिवरामनगर, दसकगांव, महालक्ष्मीनगर, बालाजीनगर, तिरूपतीनगर, पारिजातनगर, गोसावीनगर आदी परिसर, प्रभाग क्रमांक १८ मधील पवारवाडी परिसर, जुना सायखेडा रोड, भैरवनाथ नगर, जागृतीनगर, अयोध्यानगर, पंचक गांव परिसर, प्रभाग क्रमांक २१ मधील आनंदनगर, जय भवानी रोड, रोकडोबा वाडी, देवळाली गांव परिसर, प्रभाग क्रमांक २२ मधील देवळालीगांव गांवठाण परिसर, प्रभाग क्रमांक २० मधील लोकमान्य नगर, राम नगर, गंधर्व नगरी, आरंभ महाविद्यालय परिसर, जिजामातानगर, कलानगर, ब्रह्मगिरी सोसायटी, भीमनगर व दत्त मंदिर परिसर आदी ठिकाणी रविवार सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. नागरिकांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शहरात अनेक भागात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या प्रश्नावरून महापालिकेवर राजकीय पक्षांनी मोर्चेही काढले होते. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी मुंबईत बैठक घेतली होती. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. या परिस्थितीत नाशिकरोड भागात संपूर्ण दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडणार असल्याची भावना उमटत आहे.