नाशिक – सध्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलात रिक्त जागी भरतीचे वारे वाहत असून नाशिक ग्रामीण पोलीस दलात २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलात १५० आणि २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली होती. त्यानंतर भरतीच झालेली नसताना आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शिपाई आणि चालक पदांसाठी ३८० जागा भरल्या जाणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलात २१० शिपाई, ५२ चालक, तर कारागृह दलात ११८ शिपाई अशा एकूण ३८० जागांवर भरती होत आहे. विशेष म्हणजे या भरतीत २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी मिळणार आहे. ही त्यांना मिळणारी शेवटची संधी राहणार आहे. अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी ताटकळणाऱ्या उमेदवारांना ही मोठी संधी आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई गटात सुमारे १५ हजार रिक्त पदांसाठी भरती राज्याच्या गृह विभागाने जाहीर केली. या भरतीविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. वय ओलांडणाऱ्यांसाठी ही अखेरची संधी असल्याने त्यांनी शारीरिक चाचणीत नंबर लागण्यासाठी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारावर अंतिम निवड केली जाणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेही त्यासाठी सहाय्य घेतले जाणार आहे.
२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बळ लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलीस दलात होणाऱ्या भरतीला महत्व प्राप्त झाले आहे. २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलात १५० आणि २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाल्यानंतर तेव्हांपासून भरतीच झालेली नव्हती. भरतीप्रक्रियेनुसार https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx यावर अर्ज नोंदणी करावी लागणार आहे. एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त अर्ज भरता येणार नाहीत. सर्वांची लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे.
प्रथम ५० गुणांच्या शारीरिक चाचणीनंतर त्यातून एका पदासाठी १० याप्रमाणे उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाईल. लेखी परीक्षा १०० गुणांची होईल. शारीरिक आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. सर्व माहितीसाठी https://www.nashikruralpolice.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या भरती प्रकियेसंदर्भात कोणाला काही संशयास्पद वाटल्यास त्यांनी
ॲन्टी करप्शन ब्युरो यांच्याशी (०२५३-२५७५६२८ अथवा २५७८२३०), नाशिक ग्रामीण पोलिसांशी (०२५३-२३०९७०० किंवा २२००४५०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
