नाशिक – २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे ४०० एकर जागेवर साधुग्राम उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्याकरिता तपोवनमधील ३१८ एकर जागा निश्चित असूून अतिरिक्त जागेसाठी दिंडोरी रस्त्यावरील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) १०० एकर जागेचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे. गोदाकाठ परिसरात पाच नवीन पूल उभारण्याचे नियोजन आहे.

नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालक सचिव तथा ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी बैठक घेतली. कुंभमेळ्यासाठी ज्या महत्वाच्या कामांना वेळ लागणार आहे, ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कागदावर चित्र रंगवण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर काय आवश्यकता आहे, याचा विचार करून नियोजनाची गरज त्यांनी मांडली.

त्र्यंबकेश्वर येथे मलजल केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी घाटाच्या पलीकडे सोडावे, असे डवले यांनी सूचित केले. प्रयागराजमधील कुंभमेळा पाहता नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या आगामी कुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी होऊ शकते. गर्दीवर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सीसी टीव्हीची यंत्रणा सक्षम करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नियोजन आवश्यक आहे. जेणेकरून एखाद्या भागात गर्दी वाढण्याची शक्यता असल्यास सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षातून तातडीने व्यवस्थापन करता येईल, असे डवले यांनी सांगितले. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी गोदा काठावर पाच नवीन पूलांची उभारणी हे प्राधान्यक्रमात असल्याचे नमूद केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तयारीला वेग

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आता बैठकांवर बैठकांचे सत्र सुरु करण्यात आले आहे. कुंभमेळ्यास अवघा दोन वर्षांचा कालावधी राहिल्याने तयारीला वेग द्यावा लागणार आहे. साधुग्रामसाठी अतिरिक्त जागा, गोदाकाठावर अजून पूल यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत. इतरही अनुषंगिक विषय बैठकांमध्ये चर्चेला येणार आहेत.