नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार, अशी ग्वाही भूमीपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

ठक्कर मैदानात आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री माणिक कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार , जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रवीण गेडाम, प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. मागील कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुंभमेळ्यात गतवेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची व्यवस्था, सुरक्षा, पर्वस्नान व अमृतस्नानाचे नियोजन आणि या सोहळ्याचा मुळ गाभा असलेल्या आध्यात्मिकतेचा अनुभव भाविकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यामतून २० हजार कोटीपेक्षा अधिकची कामे सुरू करण्यात येत आहेत. कुंभमेळ्यापर्यंत ही रक्कम २५ हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहतील.

शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात कामाला सुरूवात होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनीही यासाठी सहकार्य केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.नाशिक कुंभमेळ्यासाठी रस्ते, महामार्ग दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची योजना, गोदावरीचे पावित्र्य राखणे, चांगल्या घाटांची निर्मिती, जुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवन, विकासकामे करतांना गोदाघाटाचे पुरातन रुप कायम ठेवणे ,यावर भर देण्यात येत आहे. विकासकामांच्या माध्यमातून नाशिकचे रुप बदलेल आणि शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २ हजार २७० कोटी रुपये, तर नाशिक महानगरपालिकेतर्फे ३ हजार ३३८ कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत.

नाशिकमध्ये वेगवेगळी कामे होत असतांना त्र्यंबकेश्वरमध्ये काय, असा प्रश्न उपस्थित होईल. मात्र सध्या त्या ठिकाणी नगरपरिषद निवडणुकांमुळे आचारसंहिता आहे. मी काही बोललो तर आचारसंहितेचा भंग होईल. येथे जिल्हाधिकारी स्वत: बसलेले आहेत. मी काही बोललो तर ते माईक खेचतील. तेवढे अधिकार त्यांना आहेत. एवढेच सांगतो की, त्या ठिकाणीही कामे सुरू असून उत्तम पध्दतीने होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले