दोन दिवसांपासून स्थानकावर येत आहे, पण आल्या पावली परत जावे लागते. दुपापर्यंत समजेल बस सुरू होतात की नाही म्हणून स्थानकात बसची वाट पाहतोय अशी एकीकडे अगतिकता तर दुसरीकडे, प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या वागण्यावरच का बोट ठेवता. आम्हाला बस चालविताना काय अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी उद्विग्नता. या प्रतिक्रिया आहेत, प्रवासी आणि बसचालकांच्या. महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेसच्या वतीने (इंटक) पुकारलेला संप दुसऱ्या दिवशी वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक बोलणीचे संकेत येईपर्यंत कायम राहिला. दुपारनंतर हळूहळू रस्त्यावर बस धावू लागल्या. पण, आधीच तोटय़ात असलेल्या परिवहन महामंडळाला संपामुळे एकटय़ा नाशिक जिल्ह्यात ५० लाखांहून अधिकचा तोटा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेतनवाढीच्या करारावर आक्षेप आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी इंटकने राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. गुरुवारपासून सुरू झालेल्या आंदोलनास जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी सुरू असलेली बसवाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचा दुहेरी फटका प्रवाशांना सहन करावा लागला. बाहेरगावी जाण्यासाठी बसगाडय़ा नाहीत आणि खासगी वाहनधारकांनी अक्षरश: लूट सुरू केल्याने त्यांची कोंडी झाली. इंटक मागण्यावर ठाम राहिल्याने पहिल्या दिवशी संपावर काही तोडगा निघाला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक संकेत आल्यामुळे आंदोलकांनी कामावर हजर होण्याची तयारी दर्शविली. परंतु, तोपर्यंत बराच कालापव्यय झाला असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

२५ टक्के वेतनवाढ, राज्य शासन व परिवहन महामंडळाच्या असंवेदनशीलतेचा निषेध, कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू करणे, महिला कर्मचाऱ्यांना विविध सोयी सवलती, प्रलंबित मागण्यांची सोडवणूक या मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडल्या. संपात शुक्रवारी दुपापर्यंत प्रवासी भरडले गेले. गुरुवारी आल्या पावली परतलेले बहुतांश प्रवासी शुक्रवारी सकाळी पुन्हा मध्यवर्ती बस स्थानक, मेळा बस स्थानक आणि मुंबई नाक्यावरील महामार्ग बसस्थानकात आले. तिन्ही स्थानकांत १०० हून अधिक बसगाडय़ा उभ्या होत्या. त्यांचे फलक काढून घेतले गेले होते. चालक-वाहकांनी रिकाम्या बसमध्ये वामकुक्षीचा आनंद घेतला. इंटकचे पदाधिकारी जयप्रकाश छाजेड यांच्या समर्थकांनी बस रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप इतर संघटनांनी केला आहे. प्रवासी स्थानकातील बस मार्गस्थ होतील या आशेवर होते. घडाळ्याचे काटे पुढे सरकत असूनही काही चिन्हे दिसत नसल्याने काहींनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. काही प्रवासी अडकून पडले. विंचूर येथील रहिवासी बाळू घुमरे त्यांपैकीच एक. मंडळींसोबत नाशिकला नातेवाईकांकडे आलो. बस बंद असल्याने कालही परत जावे लागले. आज शिदोरी घेऊन आलो. आम्ही दोघं वृद्ध आहोत. बस अध्र्या पैशात थेट गावात घेऊन जाते. यामुळे सकाळी सातपासून इथेच वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. संपामुळे महेंद्र सिंगच्या नोकरीच्या आशेवर पाणी पडण्याची वेळ आली. त्याची वसईला मुलाखत होती. आदल्या दिवशी बसचा संप असल्याने येऊ शकत नसल्याचे सांगितले होते. आजही तसेच झाले तर नोकरी हातची जाईल, असे सांगत सकाळी सहापासून बसची वाट पाहत असल्याचे नमूद केले. दरम्यान, दुपारी वरिष्ठ पातळीवर इंटकच्या मागण्या मान्य झाल्याचे वृत्त आल्यावर रस्त्यावर तुरळक स्वरूपात बसगाडय़ा धावण्यास सुरुवात झाली. स्थानकांवर ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे नाशिक विभागातील १३ आगारांना तब्बल ५० लाखांचा फटका बसला. नाशिक विभागातील ही आगारे आधीच तोटय़ात आहेत. त्यात नव्याने भर पडली.

संपात सहभागी असलेले वाहक आणि चालक यांच्यावर मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार कारवाई करण्याचा इशारा विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिला आहे.

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik st department suffer a loss of 50 lakhs in one and half day
First published on: 19-12-2015 at 03:38 IST