नाशिक – नाशिक साखर कारखान्याचा २०२५-२६ वर्षाचा गळीत हंगाम ऊस उत्पादक, कामगार ऊसतोड मजुर यांच्या सहकार्यातून यशस्वी करण्याचे शिवधनुष्य संचालक मंडळाने उचलले आहे. यंदाच्या गळीतास येणाऱ्या उसाला शेजारील इतर कारखान्याच्या तुलनेत योग्य तो भाव देण्यात येईल, अशी ग्वाही नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे द्वारा अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल ॲण्ड एनर्जी लिमिटेड नाशिक संचलित राजगंगा शुगर मिल प्रा. लि. पुण्याचे संचालक प्रसाद घावटे यांनी दिली.
नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात शेतकरी, कामगार यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, तसेच पंजाब नॅशनल बँकेचे नाशिकचे शाखा व्यवस्थापक अनिकेत भोसले, राजगंगाचे संचालक हृषिकेश बत्ते, नितेश गायखे, नाशिक जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक रत्नाकर हिरे, व्यवस्थापक प्रदिप आव्हाड, मिलिंद देवकुटे, हिरामण नळवाडे, माजी उपाध्यक्ष रघुनाथ बरकले, लिलाबाई गायधनी, बाबुराव मोजाड, पळसेचे सरपंच ताराबाई गायधनी, नानेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, बाजार समिती उपसभापती जगन्नाथ कटाळे, लक्ष्मणराव सांगळे, कैलास टिळे, नवनाथ गायधनी, नितीन कळमकर विलास गायधनी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत मोळी टाकूण करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संचालक प्रसाद घावटे यांनी मार्गदर्शन केले. माजी खासदार हेमंत गोडसे आणि राजगंगा शुगर मिल प्रा.लि. पुणेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची पुढील वाटचाल आश्वासक पध्दतीने केली जाणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देऊन उच्चांकी गळीत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी कृतीशील कार्यक्रम तयार करून त्या माध्यमातून एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. राजगंगा ग्रुप तत्वाने आणि प्रामाणिकपणे काम करत असून चालु वर्षी दोन लाख मेट्रिक.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी आपणा सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बाबुराव मोजाड, रघुनाथ बरकले यांनीही मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास कामगार नेते विष्णुपंत गायखे, नामदेवराव बोराडे, जनार्दन जेजुरकर, गणेश सोनवणे, काळु पाटील आडके, देविदास गायधनी, नामदेवराव गायधनी, शिवाजीराव म्हस्के, माजी उप प्राचार्य शिवाजीराव गायधनी, आदिंसह. शेतकरी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी नवनाथ धात्रक, अनिल टिळे, किशोर वारुंगसे, उमेश मोजाड, परशराम फोकणे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन झाले. तसेच कामगार आणि गाडी वाहनधारक यांचा यथोचित सत्कार कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आला.
