नाशिक – महानगरपालिकेचे वादग्रस्त निलंबित शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या कार्यकाळात नियमबाह्यपणे घेतले गेलेले निर्णय उघड होत आहेत. आयुक्तांची मान्यता न घेता आणि शिक्षकांच्या शेरावहीत नोंद न करता पाटील यांनी केलेल्या ७० शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्त तथा प्रशासक करिश्मा नायर यांनी घेतला आहे. संबंधित शिक्षकांची पूर्वीच्या शाळेत रवानगी करण्यात आली आहे.

महापालिका शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार शासनाने नेमलेल्या समितीच्या चौकशीत उघड झाला. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त शिक्षणाधिकारी पाटील यांची उचलबांगडी झाली होती. राज्यातील विविध भागातील ५२ शिक्षकांना मनपा शाळेत समायोजित करताना अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांना मनपा शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले. लगोलग पाटील यांनी मनपा शाळेतील शिक्षकांच्या केलेल्या बदल्याही रद्दबातल करण्यात आल्या. पाटील यांच्या काळातील शिक्षकांच्या बदल्यांची माहिती मुख्याध्यापकांकडून प्राप्त करून घेण्यात आली. २१ शिक्षकांच्या शेरापुस्तकात याबाबत नोंद नव्हती. तर ४९ शिक्षकांची बदली करताना मनपा आयुक्तांची मान्यता घेतली गेली नाही. त्यामुळे या बदल्या रद्द करुन संबंधितांनी पूर्वीच्या शाळेत तत्काळ हजर व्हावे, असे निर्देश प्रभारी आयुक्त नायर यांनी दिले आहेत.