नाशिक : दुचाकीने जात असताना शहरातील गंगापूर रोडजवळील बारदाना फाटा चौकात दुचाकी घसरून अलीकडेच झालेल्या अपघातात मित्र-मैत्रीण असे दोघे रस्त्यावर पडले होते. यावेळी मागून येणाऱ्या वाहनाखाली सापडून १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. याचा धक्का २१ वर्षाच्या मित्राला बसला. अपघातापासून तो अस्वस्थ होता. रुग्णालयातून घरी आल्यानंतर कुटुंबियांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणाचे लक्ष नसताना या युवकाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पाच दिवसांच्या कालावधीत मित्र-मैत्रिणींचे असे अकस्मात जाणे सर्वांना चटका देणारे ठरले.

नीलेश पाटील (२१, परिश्रम हाईट्स, चेतनानगर) असे या युवकाचे नाव आहे. २४ ऑगस्ट रोजी तो मैत्रीण माही शर्मा (१८, नयनतारा अपार्टमेंट, चेतनानगर) हिच्याबरोबर मोटारसायकलने गंगापूर गावाकडे गेला होता. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोघे परतीच्या मार्गावर होते. गंगापूर गावाकडून सातपूरकडे जाणारा रस्ता आहे. बारदान फाटा नावाच्या चौफुलीवर सिग्नल आहे. या चौकात त्यांची मोटारसायकल घसरली. दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी मागून जनरेटर घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनाच्या चाकाखाली माही सापडली. चाक तिच्या डोक्यावरून गेले. गंभीर जखमी झालेल्या माहीसह नीलेशला नागरिकांसह नातेवाईकांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच माही शंर्मा हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या अपघाताबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

अपघातात नीलेश पाटील यालाही किरकोळ दुखापत झाली होती. अपघातात मैत्रिणीला गमवावे लागल्याने तो दु:खी होता. आपल्यामुळे अपघात झाल्याची त्याची भावना झाल्याचे सांगितले जाते. रुग्णालयातून घरी आणल्यानंतर कुटुंबियांनी नीलेशला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याची समजूत काढली. तो एकटा राहणार नाही, याची दक्षता घेतली. परंतु, कुटुंबियांचे हे प्रयत्न व्यर्थ ठरले. गुरुवारी तो कुटुंबियांसमवेत चेतनानगर भागातील आपल्या घरात होता.

रात्री साडेआठ वाजता कुणाचे लक्ष नसल्याचे पाहून तो एका खोलीत गेला. आतून खोली बंद केली. कुणाला काही समजण्याच्या आत पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. हा प्रकार काही वेळाने लक्षात आल्यावर भाऊ शरद पाटील याने बेशुद्धावस्थेत त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच नीलेशचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. २१ वर्षीय नीलेश गुरू गोविंद सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बारदान फाटा येथील अपघातात मैत्रिणीला गमवल्यानंतर नैराश्येत त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.