नाशिक – अंतराळ विश्वातील वैज्ञानिक घडामोडी, चांद्रयान मोहीम, गगनयान, अचूक नेव्हिगेशन प्रणाली दर्शविणारे आधुनिक तंत्रज्ञान यासह विज्ञानातील तब्बल २०० प्रयोगांमधून “सायन्स ऑन व्हील्स” ही अनोखी बस साकारण्यात आली आहे. ‘चाकं शिक्षणाची’ आणि ‘एआय ऑन व्हील्स’ या दोन्ही प्रकल्पांच्या यशस्वी प्रयोगानंतर नाशिक येथील इस्पॅलिअर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही बस जणू फिरती वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायन्स ऑन व्हील्स या बसच्या माध्यमातून आधुनिक विज्ञानाचे धडे मिळणार आहेत.
इस्पॅलिअर स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही इनोव्हेशन डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी ‘सायन्स ऑन व्हील्स’ या अनोख्या बसचे लोकार्पण करण्यात आले. ही बस पूर्वी ‘एज्युकेशन ऑन व्हील्स’ म्हणून वापरली जात होती. बसमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय शिकवले जात असल्याने आणि तिच्या अनोख्या डिझाइनमुळे गरीब वस्त्यांमधील विद्यार्थ्यांचा ती विश्वास जिंकू शकली. आणि १९ हजारपेक्षा जास्त शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य यशस्वीपणे केले.
आदिवासी तसेच ग्रामीण भागात अंधश्रद्धा अधिक असतात. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती नसल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळत जाते. त्यातून अनेक अघोरी प्रथाही सुरू होतात. अंधश्रद्धेला दूर करून या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या संकल्पनेनुसार आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने वेगवेगळे २०० वैज्ञानिक प्रयोग साकारण्यात आल्यावर सायन्स ऑन व्हील्स ही फिरती प्रयोगशाळा तयारी झाली.
आदिवासी शाळांकडे वैज्ञानिक प्रयोगशाळांची सुविधा नसल्यामुळे ही बस विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत विज्ञानाचे प्रकल्प, प्रयोग आणि अनुभवात्मक शिक्षण घेऊन जाणार आहे. मुख्य म्हणजे या बसमध्ये २०० पेक्षा अधिक शास्त्र विषयाचे प्रारुप आहेत. जे शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केले असून सामाजिक भावनेतून हे सर्व प्रारुप त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भेट दिले आहेत. बसच्या बाहेरील सजावट आदिवासी वारली चित्रकलेच्या माध्यमातून करण्यात आली असून, त्यातून वैज्ञानिक प्रकल्प दर्शविण्यात आले आहेत. या प्रोजेक्टला स्कूलच्या चेअरमन डॉ. प्राजक्ता जोशी यांनी मार्गदर्शन केले असून इनोव्हेशन डेचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापक अंकिता कुर्या, वैशाली जालीहलकर आणि सबा खान यांनी केले.
विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना समजण्यास मदत
आम्ही अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत आहोत. आदिवासी भागांमध्ये अजूनही अंधश्रद्धा आहेत. त्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावा, यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ च्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोग केल्याने, त्यातून आलेल्या अनुभवाने विद्यार्थ्यांना शिकायला मिळते. यामुळे त्यांची जिज्ञासा वाढते, त्यांची निरीक्षण क्षमता सुधारून समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. या फिरत्या वैज्ञानिक प्रयोगशाळेचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्की होईल. – सचिन जोशी (शिक्षण अभ्यासक, नाशिक)