नाशिक : विधीमंडळ सभागृहात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी खेळत असल्याची कथित चित्रफित प्रसारीत झाली. तेव्हापासून भ्रमणध्वनीवर खेळल्या जाणाऱ्या जोखमीच्या रमी खेळाची चर्चा सुरू झाली. खरंतर घरोघरी कुठल्याही कारणांनी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक एकत्र आले की, पत्त्याच्या खेळाचे पारंपरीक डाव रंगतात. त्याने मनोरंजन होते. वेळ घालवण्याचे ते माध्यम मानले जाते. याच कारणास्तव काही वर्षांपूर्वी तो ऑनलाईन उपलब्ध झाला.

पारंपरिक पद्धतीपेक्षा अनेकांना ऑनलाईन रमी अधिक रोमांचकारी वाटतो. अनेक कंपन्या ऑनलाईन स्वरुपात हा खेळ उपलब्ध करतात. पारंपरिक खेळात जशी काही प्रमाणात सदस्यांची निकड असते, तसे ऑनलाईन खेळात नसते. कुठल्याही वेळी ऑनलाईन स्पर्धेक सहभागी होतात. दिग्गज खेळाडू व अभिनेत्यांकडून होणाऱ्या जाहिरातीमुळे ऑनलाईन विश्वात विशिष्ट एका रमीचा बोलबाला झाला. कृषिमंत्री कोकाटे हे याच प्रकारातील रमी खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अर्थात ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली, तेव्हापासून एक रुपयाची रमी खेळलेलो नाही आणि हा खेळ आपल्याला खेळताच येत नसल्याचा दावा कोकाटे यांनी केलेला आहे. यावेळी मात्र त्यांनी रमी खेळण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खाते संलग्न असल्याशिवाय हा खेळता येत नसल्याकडे लक्ष वेधले.

कोकाटे यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे जाणकार सांगतात. कारण, एकदा रमीचे ॲप डाऊनलोड केल्यावर पैसे लावून वा मोफत सराव स्वरुपात तो खेळता येतो. सराव स्वरुपातील खेळात खेळणारा वारंवार जिकतो. जिंकल्यामुळे पैसे जिंकण्याची आशा पल्लवित होते. मग माणूस रोख स्वरुपातील जोखीम स्वीकारतो आणि अमिषाला बळी पडतो, असे जाणकार सांगतात.

पारंपरिक पत्त्यांचे डाव वेगवेगळ्या पद्धतीने खेळता येतात. तसेच ऑनलाईन रमीत विविध प्रकार आहेत. यामध्ये रमी १३ कार्ड, रमी, २१ कार्ड रमी, पॉइंट रमी, डिल्स रमी , पूल रमी, रमी टूर्नामेंट सारख्या प्रकारांचा समावेश आहे. काही कंपन्या रमी हा गेम २ डी, ३ डी टेबल्स संकल्पनेत खेळण्याची सुविधा देतात. या व्यासपीठावर स्पर्धा खेळून रोख रक्कम जिंकता येते. कौशल्यावर आधारीत हा खेळ असल्याची जाहिरात होते. मात्र, केवळ कौशल्याच्या आधारावर तो जिंकता येत नसल्याचे खेळणाऱ्यांकडून सांगितले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे लावून खेळण्यास सुरुवात केल्यावर हार-जितचे सत्र सुरू होते. माणूस गुरफटत जातो. आर्थिक जोखीम वाढते आणि ऑनलाईन खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करणाऱ्या कंपनीचे भले होते, असे बहुुतेकांचे म्हणणे आहे. पारंपरिक रमी पैसे लावून खेळल्यास तो जुगार ठरतो. कौशल्याधारीत खेळाचे नाव पुढे करून ऑनलाईन स्वरुपातील रमी देखील जुगारच असल्याचा अनेकांचा आक्षेप आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात मागे याचिकाही दाखल झाली होती. तेव्हा न्यायालयाने रमी ऑनलाईन गेमिंक खेळ नशिबाचा की कौशल्याचा भाग आहे याबाबत सरकारला विचारणा केली होती. ऑनलाईन रमीवर बंदी घालण्याची मागणी राजकीय पक्षांसह अनेकांकडून वारंवार केली जाते.