नाशिक – मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टाकळ्याची वाडीला पाण्याच्या एकेका थेंबासाठी झगडावे लागत असल्याचे समजल्यानंतर नाशिकच्या सोशल नेटवर्किंग संस्थेने (एसएनएफ) टाकळ्याची वाडी आणि बोरीची वाडी या दोन गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पर्याय शोधला आहे. विशेष म्हणजे ठाणे येथील दुर्गपरमेश्वरी आणि साडेतीन शक्तीपीठ प्रतिष्ठान या संस्थेने या योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध केला आहे. या मदतीमुळे गावात लवकरच बाराही महिने पाणी उपलब्ध होण्याच्या दिशेने काम सुरू झाल्याचे एसएनएफ संस्थेने म्हटले आहे.
त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्याच्या सीमेवरील अंजनेरी पर्वताच्या कुशीत वसलेली टाकळ्याची वाडी. एसएनएफ संस्थेच्या पथकाने गावाला विनाकष्ट पाणी कसे देता येईल, यासाठी अनेकदा तिथे भेटी दिल्या. अथक प्रयत्नांती टाकळ्याची वाडी तसेच बोरीची वाडी या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पर्याय शोधण्यात आला. प्रत्येक उन्हाळ्यात तीन, चार महिने या गावातील सुमारे ५०० आदिवासी लोकांना अंजनेरी डोंगरातील एका छोट्याशा झऱ्यावर अवलंबून राहावे लागते. यातून दोन-तीन दिवसांत एका खड्ड्यात थोडे फार पाणी जमा होते. त्या जमा होणाऱ्या पाण्यावरच हे गाव तहान भागवते. ते पाणीही भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन दिड ते दोन किलोमीटर पायपीट केल्यावर घरात येते. आठवड्यातून चार, पाच हंड्यांवर गुजराण करण्याची वेळ संबंधितावर आली.
एक सरकारी योजना अर्धवट अपूर्णावस्थेत आहे. रस्ता नसल्याने पाण्याचा टँकर पोहोचण्याचा प्रश्नच येत नाही. जंगलात एक तलाव आहे, तिथे जायला रस्ता नाही. परिस्थिती इतकी विदारक आहे की, गावातील लोक आठवड्यातून एक-दोनदाच आंघोळ करतात. ही स्थिती लक्षात घेऊन एसएनएफ संस्था कामाला लागली. ठाणे येथील दुर्गपरमेश्वरी आणि साडेतीन शक्तीपीठ प्रतिष्ठान संस्थेने आठ लाख ३५ हजार रुपयांचा निधी लगेच उपलब्ध करून दिला. या मदतीमुळे पुढील काम सोपे झाले. संस्थेचे पदाधिकारी योगेश क्षीरसागर यांनी पाणी टंचाईची माहिती मिळताच मदतीची तयारी दर्शविली. त्यानंतर योगेश, त्यांचे वडील रमेश क्षीरसागर, एसएनएफ पाणी योजना प्रमुख प्रशात बच्छाव, भूगर्भशास्त्रज्ञ डाॅ. जयदीप निकम यांच्यासह नुकतीच एसएनएफच्या पथकाने दोन्ही गावांना भेट दिली. योजनेच्या दीर्घकालीन शाश्वततेविषयी खात्री करून घेतली. गावकरीही पूर्ण उत्साहाने श्रमदानासाठी तयार आहेत. लवकरच हा प्रकल्प गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरविणार आणि मुलांची पाण्यासाठीची पायपीट थांबवेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
गेल्या १० वर्षात एसएनएफने ३३ गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण केले आहे. आता या आनंदाच्या उत्सवात आणखी दोन गावे सामील होणार आहेत. आमच्या या नव्या जलाभियानात कोणतीही औपचारिकता न करता दुर्गपरमेश्वरी संस्थेने त्वरित निधी उपलब्ध करून दिला. ही कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या सहकार्यामुळे या वाड्यांना नवजीवन मिळणार आहे. – प्रमोद गायकवाड (संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम)