नाशिक – शहरातील महात्मा नगर परिसरातील बिबट्याचा थरार नाशिककरांनी मागील आठवड्यात अनुभवल्यानंतर नागरी वस्तीमधील बिबट्याचा वावर पुन्हा ठळकपणे समोर आला.

सोमवारी भोसला शाळेच्या आवारात बिबट्या दिसल्याने धावपळ उडाली. त्यामुळे शाळा मधल्या सुट्टीनंतर सोडून द्यावी लागली. दुपारची शाळा भरली नाही. पालकांपर्यंत निरोप पोहचवितांना शाळेची दमछाक झाली. यादरम्यान जवळच्या परिसरात राहणारे पालक मिळेल त्या वाहनाने मुलांना घेण्यासाठी शाळेत पोहचले. काहींना शाळेच्या विद्यार्थी वाहतूक वाहनाच्या माध्यमातून घरापर्यंत सोडण्यात आले. दुसरीकडे वन विभाग ड्रोन आणि अन्य माध्यमातून बिबट्याच्या शोध मोहिमेत लागले.

काही महिन्यांपासून शहरात बिबट्यांचा संचार वाढला आहे. गंगापूर भागातील शिवाजीनगर येथील सुनील पाटील यांच्या मालकीच्या गटात बिबट्याचा असणारा वावर पाहता या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात गुरूवारी एक ते दीड वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला. याबाबत वनविभागाला परिसरातील नागरिकांनी माहिती देताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

बिबट्यास तात्काळ ताब्यात घेत म्हसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकाराला काही तास उलटत नाही तोच महात्मा नगर परिसरातील वनविहार कॉलनी या ठिकाणी शुक्रवारी बिबट्या शिरला. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी होती. बिबट्याने रस्त्यावरील काही नागरिकांवर हल्ला चढविला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोनहून अधिक नागरिक जखमी झाले.हा बिबट्या सायंकाळी उशीराने ताब्यात आला.

या घटनेला ४८ तासही होत नाही तोच सोमवारी भोसला शाळेच्या आवारात बिबट्या आढळला. याविषयी वनविभागाला माहिती दिली असता ड्रोनच्या साहाय्याने परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत असल्याने शोध मोहिमेत अडचण आली. भोसला सैनिकी शाळेच्या प्रशासनाशी चर्चा करून खबरदारीचा उपाय म्हणून शाळेचे दुपारचे सत्र रद्द करण्यात आले आहे. सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना सुखरूपरीत्या शाळेच्या आवारातून शालेय वाहनाद्वारे बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, याविषयी पालकांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून माहिती दिली असता काही पालक कामावर असल्याने मुलांपर्यंत पोहचण्यात अडचणी आल्या. काहींनी घरापासून मिळेल त्या वाहनाने शाळा गाठत मुलांना ताब्यात घेतले. बिबट्याचा शाळेतला वावर आणि मुलांपर्यंत वेळेत पाेहचण्याची धास्ती, या तणावात पालकांना शाळेत पोहचण्याची कसरत करावी लागली.

याविषयी वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी माहिती दिली. भोसला सैनिकी शाळेच्या परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली. वनविभागाचे पथक शाळेत दाखल झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी शालेय परिसर निर्मनुष्य करण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.