नाशिक – वेगवेगळ्या ऋतुत पक्षी सभोवतालची परिस्थिती आणि वातावरणाचा अंदाज घेऊन घर अर्थात घरटी बांधायला घेतात. त्यासाठी गवत, काडी, कापूस तसेच इतर मऊ उबदार वस्तू वापरल्या जातात. जोराचा वारा आणि पावसापासून संरक्षण होईल, सहज कोणाच्या नजरेला पडणार नाही, अशा ठिकाणी घरटी बांधतात.

निसर्गात आता काही पक्षी हे दुसऱ्या पक्ष्याने तयार केलेल्या आयत्या घरट्यांमध्ये आक्रमण करतानाचे धक्कादायक चित्र बघावयास मिळत आहे. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जैवविविधतेने बहरलेल्या आवारात सुगरणीच्या खोप्यात चक्क खवलेकरी मुनिया आणि माळमुनिया या दोन जातींच्या मुनिया पक्ष्याने अतिक्रमण केले असल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासक तथा यश सेंटर फॉर बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन समितीचे सदस्य प्रा.आनंद बोरा यांनी नोंदविले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यश सेंटर फॉर बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन समितीतर्फे सुरु असलेल्या पक्षी सर्वेक्षणात ही दुर्मीळ घटना बघावयास मिळाल्याचे प्रा. बोरा यांनी नमूद केले आहे. या परिसरात तलावाच्या बाजूला बाभळीच्या झाडावर २० ते २५ खोपी आहेत. जून आणि जुलैमध्ये सुगरणीने मेहनतीने बनविलेल्या खोप्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात दोन वेगवेगळ्या जातींच्या मुनियांनी शिरकाव करून खोपे ताब्यात घेतले. संसाधने मर्यादित होऊ लागल्याने ती मिळविण्यासाठी ही सजीवांमध्ये होणारी स्पर्धा असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सुगरण पक्ष्यांची लोंबकळणारी घरटी जगातील सर्वात गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट वास्तुशास्त्राचा नमुना मानला जातो. सुगरण हा चिमणीच्या आकाराचा पक्षी आहे. पिवळ्याधम्मक रंगातील नर पक्षी घरटे बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या विहिरीजवळील बाभळीच्या झाडाला सुगरण पक्ष्यांची घरटी लटकताना दिसतात. चोचीच्या मदतीने सुबक आणि आकारबद्ध घरटे विणण्याचे कसब सुगरण पक्ष्याजवळ आहे. म्हणून त्याला कसबी विणकर म्हटले जाते. एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसऱ्या मादीला बोलविण्यासाठी गाणी म्हणतो. नर सुगरण एकावेळी एकापेक्षा जास्त मादींचा “दादला” असतो. अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी एकही घरटे मादीला पसंत न पडल्यास नर ते झाड किंवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरू करतो.

दुसरीकडे, मुनिया पक्ष्याला सुगरण पक्ष्याच्या घरट्यात जागा किंवा सुरक्षितता हवी असते, त्यामुळे ते तिथे शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुगरण पक्ष्याला आपले घरटे सोडावे लागते. मुनिया पक्षाचे घरटे एखाद्या चेंडूप्रमाणे असते. गर्द फांद्यांमध्ये आजूबाजूच्या परिसरातील पालापाचोळा वापरून त्यांना गोल गोळ्याप्रमाणे रचले व गुंतवले जाते. घरट्याचे प्रवेशद्वार एका बाजूस असते. आतमध्ये खोली असते. परंतु, असे घरटे बनविण्याचे सोडून ते सुगरणीच्या तयार खोप्यात राहणे पसंद करू लागले आहेत. सिमेंटच्या जंगलात तेदेखील आता स्वतःमध्ये बदल करून घेत असल्याचे चित्र बघावयास मिळते.

मुनिया पक्ष्याने सुगरणीच्या खोप्यात मुक्काम ठोकण्याची काही कारणे आहेत. त्यात वृक्ष,आणि माळराने कमी होणे, हे मुख्य कारण आहे. हिवाळ्यात शेती कामांना वेग येत असल्याने त्यांची घरटी असुरक्षित होतात. शिकारी पक्ष्यांना ही घरटी दिसू लागल्याने पिलांना धोका निर्माण होतो. माळरानातील गवत हिवाळ्यात काढले जात असल्याने पक्ष्यांची घरटी उदध्वस्त होतात. यामुळे पक्ष्यांनी देखील स्वतः मध्ये बदल घडवून आणत दुसऱ्या पक्ष्याचे घरटे स्वीकारण्यास सुरवात केली आहे. काही पर्यटक सुगरणीचे रिकामे घरटे तोडून घरात आणून लावतात. हे किती चुकीचे आहे, हे देखील यामुळे दिसते.

यश सेंटर फॉर बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन समितीतर्फे मुक्त विद्यापीठ परिसरात किती जातीचे पक्षी आहेत, यासाठी वर्षभर पाहणी केली जात आहे. पाहणी करताना खवलेकरी मुनिया आणि माळ मुनिया या पक्ष्यांनी स्वतः घरटे न बांधता सुगरण पक्ष्याच्या खोप्यात वीण करणे पसंद केल्याचे दिसले. – प्रा.आनंद बोरा (पक्षी अभ्यासक)