नाशिक – गेल्यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यात नाशिकच्या मोहित भास्कर या तरुणाने देशात २६१ वा क्रमांक पटकावला. तो ऑक्टोबर महिन्यात चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत एक वर्षाच्या लष्करी प्रशिक्षणासाठी दाखल होईल

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय लष्करात अधिकारी बनून लेफ्टनंट पदावर आपली कारकीर्द सुरु करेल. याबरोबर मोहितची भारतीय हवाई दलासाठीसुद्धा निवड झाली आहे. यासाठीची एएफसीएटी परीक्षा आणि एएफएसबी मुलाखत त्याने उत्तीर्ण केली असून अंतिम गुणवत्ता यादी अद्याप येणे बाकी आहे. मोहित सिडको परिसरातील खोडे मळा येथील रहिवासी आहे. त्याचे शालेय शिक्षण डे केअर सेंटर या शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण के.टी.एच.एम. महाविद्यालयातून तर, पदवीचे शिक्षण हं.प्रा.ठा. महाविद्यालयातून झाले. त्याने पदव्युत्तर पदवी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून मिळविली होती. विशेष म्हणजे त्याने १२ वी विज्ञान शाखेनंतर पुढील उच्चशिक्षण कला शाखेतून पूर्ण केले. सात महाराष्ट्र बटालियनमधून सिनिअर डिव्हिजन एनसीसीचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. मोहितला वाचन, लिखाण आणि गिर्यारोहणाची आवड आहे.

तो १० वी पासूनच हर्षल आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्यदल अधिकारी पदासाठीच्या विविध परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करत होता. त्याचे वडील सुभाष भास्कर आणि आई संध्या भास्कर हे दोघेही इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.