आरोग्य विद्यापीठ दीक्षान्त समारंभात कुलपती कोश्यारी यांचे प्रतिपादन

नाशिक : आपल्या विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला आहे. करोनाकाळात उल्लेखनीय काम केल्याचा अभिमान आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत (ऑफलाइन) परीक्षा घेऊन विद्यापीठाने देशात वेगळा ठसा उमटवला. सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन भरीव कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २१ व्या दीक्षान्त समारंभात केले.

 दीक्षान्त समारंभ आभासी पद्धतीने कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षेतखाली झाला. या वेळी राज्यपालांनी विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पना पुढे येत असून याबाबत समतोल राखण्याकरिता समाजाच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साध्य करावी. सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन भरीव कार्य करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत विद्यापीठाने विविध सामाजिक आणि संशोधनात्मक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांनी रुग्णांची सेवा ही राष्ट्राची सेवा असल्याच्या भावनेने काम केल्यास खरी समाजसेवा होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरू डॉ. मििलद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासह नवीन पदव्युत्तर केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठ सज्ज असून यामुळे आरोग्य शिक्षण क्षेत्रात संशोधनाची व्याप्ती वाढेल, असे सांगितले.

१० हजार ६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

दीक्षान्त समारंभात विद्यापीठाकडून १० हजार ६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ९८ सुवर्णपदक, एका विद्यार्थ्यांस रोख रक्कम पारितोषिक, संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे ५१३, दंत विद्याशाखा पदवीचे दोन हजार ४१, आयुर्वेद विद्याशाखेचे १०२१, युनानी विद्याशाखेचे ७०, होमिओपॅथी विद्याशाखेचे ९३६, बेसिक बी.एस्सी. नर्सिग एक हजार ७४४ , पीबी बी.एस्सी. नर्सिग विद्याशाखेचे ३३६, बीपीटीएच विद्याशाखेचे १५०, बीओटीएच विद्याशाखेचे १४, बीएएसएलपी विद्याशाखेचे ३१, बीपीओ विद्याशाखेचे तीन, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेच्या सहा विद्यार्थ्यांना तसेच पदव्युत्तर विद्याशाखेतील एम.डी. विद्याशाखेचे २१४१, दंत ४६१, आयुर्वेद ९३, होमिओपॅथी ५३, युनानी चार,  डीएमएलटी. ७८, पॅरामेडिकल १०४, अलाईड (तत्सम) २७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.