राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) २०१९-२० या प्रथम शैक्षणिक वर्षातील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या बाबतची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा.भारती पवार यांनी दिली. २०१९-२० या काळातील प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ही मागणी होती. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे पाठपुरावा व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करून या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> पाणी टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरीत आता पुरुषांचा हंडा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र २०१९-२० या काळात करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात आणि देशात टाळेबंदी असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये बंद होती. या काळात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याने त्यांना पाचव्या वेळेस संधी निर्माण करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांच्या शिष्टमंडळाने केली होती. या अनुषंगाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासोबत चर्चा करण्यात आली. आयोगाने या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. तसेच या निर्णयामुळे महाराष्ट्रातील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या निर्णयासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.