जळगाव : महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होण्यास अवधी असला, तरी उत्तर भारतात १४ जुलैपासून त्याची सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर, राजस्थानसह हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशातून अचानक मागणी वाढल्याने जळगाव जिल्ह्यात उत्पादित केळी भावात क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांची तेजी आली आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सोसणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
उत्तर भारतात पंचांगानुसार कृष्ण पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा असल्यामुळे यंदाही त्या भागातील राज्यांमध्ये १५ दिवस आधीच पौर्णिमेनंतरच्या पहिल्या सोमवारी श्रावण महिना सुरू होत आहे. अर्थातच, बाजारात सध्या अन्य कोणत्याही हंगामी फळांची फार उपलब्धता नसल्याने केळीच्या मागणीत मोठी वाढ होण्यास चालना मिळाली आहे. त्याअनुषंगाने, फळांच्या व्यापाऱ्यांनी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तसेच महाराष्ट्रातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यांकडे केळी खरेदीसाठी आपला मोर्चा वळविला आहे. दरम्यान, गारपिटीसह वादळी पावसामुळे एप्रिल, मे आणि जूनमध्ये बागांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने विशेषतः जळगाव जिल्ह्यात यंदा केळीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मागणीनुसार मालाची उपलब्धता नसल्याच्या स्थितीत साहजिकच उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना केळीसाठी जास्तीचे पैसे मोजण्याची वेळ आली आहे.
२५ जून रोजी बऱ्हाणपुरात केळीला किमान ९७०, कमाल १९०३ आणि सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे भाव होता. १५ दिवसानंतर नऊ जुलैला तिथे केळीचे भाव किमान १६१६, कमाल २६७५ आणि सरासरी २१८० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले. दिवसागणिक केळीचे भाव वाढत असताना, संबंधित शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेकांनी अचानक भाव कोसळू नये म्हणून पुढील काळातील सणांच्या तारखा लक्षात घेऊन केळीची टप्प्याटप्प्याने काढणी करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, उत्तर भारताकडून होत असलेली मागणी आणि तयार मालाच्या तुटवड्याची स्थिती लक्षात घेता आगामी काळातही केळीचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता चोपडा (जि. जळगाव) येथील वामनरावभाऊ पाटील सहकारी फळ विक्रेता संस्थेचे सचिव मुकेश पाटील यांनी व्यक्त केली.