नाशिक : श्रीराम नवमी नंतर कामदा एकादशीला शहरातून निघणाऱ्या श्रीराम रथ आणि गरूड रथ यात्रेच्या नियोजनात अडथळा ठरणारे अनधिकृत फलक, लोंबकळलेल्या तारा. तसेच इतर अतिक्रमण हटविण्यासाठी पंचवटी पोलिसांनी संबंधित विभागांना ३१ मार्च पर्यंत मुदत दिली आहे. पंचवटी पोलिसांकडून रथमार्गाची पाहणीही करण्यात आली.

कामदा एकादशीला श्रीराम आणि गरूड रथाची यात्रा निघते. यात्रेत हजारो नाशिककर उत्साहात सहभागी होतात. रथयात्रा मार्गावर अडथळा येऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पंचवटी पोलिसांच्या वतीने सोमवारी रथमार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी परिमंडळ एकचे अधिकारी, पोलीस प्रशासन विभाग, स्मार्ट सिटी, महानगर पालिका, विद्युत विभाग, दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांसह श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते. श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पाहणीस सुरूवात झाली. श्रीराम आणि गरूड रथ ज्या मार्गाने नेले जातात, त्या नागचौक, काट्या मारूती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पुलाखालील भाग, नेहरू चौक, रोकडोबा तालीम, म्हसोबा पटांगण,, गौरी पटांगण, सरकारवाडा, भांडीबाजार, कपुरतळा मैदान, कपालेश्वर मंदिर परिसराची पाहणी करुन तेथील अडचणी समजून घेतल्या.

हेही वाचा >>> जळगावात तरुणाचा खून, दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी उपस्थितीत असलेले स्मार्ट सिटी, महानगरपालिका, विद्युत विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी रथ मार्गावर अडथळा ठरणारे रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण, अनावश्यक खडी, कच उचलून घेणे, उतार सुलभ करण्याची सूचना करण्यात आली. तसेच विद्युत विभागाला तारा उंच करण्यास सांगण्यात आले. महापालिकेला मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटवणे, फलक हटवणे, रथ मार्गावरील धोकादायक वृक्षांची छाटणी करणे, याविषयी सूचना करण्यात आल्या असून ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावे, असे पत्र सर्व विभागांना देण्यात आले आहे.