लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : प्रयागराज कुंभमेळ्यात अंतर्गत वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता आदी उपक्रमांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाहणी केली. प्रयागराज येथील मेळा क्षेत्र, आखाडे, घाट आदींना भेट देत माहिती घेतली.

प्रयागराज येथील महाकुंभमेळा नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या नेतृत्वाखाली हे पथक दोन दिवसीय दौऱ्यावर गेले आहे. पथकात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले आहेत.

२०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यास या पथकाने भेट देऊन पाहणी केली. प्रयागराज महाकुंभमेळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय आनंद यांनी नाशिकच्या पथकासमोर सविस्तर सादरीकरण करून संवाद साधला. कुंभमेळ्याच्या नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली. पथकातील सदस्यांच्या शंकांचे समाधान केले. पथकाने पहिल्या दिवशी मेळाक्षेत्र, प्रयागराज येथील विविध घाट, आखाडे आदींना भेटी दिल्या. तेथील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, उपाययोजना, भाविकांना दिल्या जात असलेल्या सुविधा आदींची माहिती घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रयागराज येथे स्थापण्यात आलेल्या एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. पोलीस, नागरी प्रशासन, अग्निशमन आणि आपत्कालीन व्य्वस्थापन आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. प्रयागराज शहरात लावलेल्या अडीच हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सनियंत्रण एकात्मिक केंद्रातून होत आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे, दूरसंचार, आपत्ती व्यवस्थापन, बीएसएफ यांसह विविध विभागांचे अधिकारी या कक्षासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचे स्वरुपही पथकाने समजावून घेतले. पथकात समाविष्ट विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागांशी निगडीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेवून प्रयागराज येथे करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली.

कॉल सेंटरला भेट

नागरिकांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या ५० दूरध्वनी संच असलेल्या सुसज्ज टेलिफोन कॉल सेंटरच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी, नातेवाईक हरवले तर त्यांच्या मदतीसाठीचा हा संपर्क कक्ष आहे. पथकाने ‘डिजिटल महाकुंभ’ला भेट देवून भाविकांना देण्यात येणाऱ्या माहितीविषयी जाणून घेतले.