धुळे – रक्षाबंधनानिमित्त धुळे जिल्ह्यातील महिलांना पोलिसांकडून मिळालेली भेट कौतुकाचा विषय ठरली आहे. महिलांसाठी सध्या सुरक्षितता हा काळजीचा विषय झाला असून त्यांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलीस आता प्रयत्न करणार आहेत. धुळे जिल्ह्यात कुठेही छेडछाड होत असल्यास काही वेळेत टवाळखोरांच्या हातात बेड्या पडणार आहेत. जिल्हा पोलीस दलाने रक्षाबंधनानिमित्त धुळे जिल्ह्यातील महिला आणि युवतींना सुरक्षेच्या दृष्टीने “डायल ११२” ही भेट दिली आहे.
या सुविधेमुळे अवघ्या काही मिनिटातच छेड काढणाऱ्या टवाळखोरांना भोगा वाजवित येणाऱ्या पोलीस वाहनांचा वेढा पडेल. त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, अशी ही महिला, युवतींसाठी दिलासा देणारी योजना आहे. धुळे जिल्ह्यातील महिला आणि विशेषतः तरुणी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांची अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी टवाळखोरांकडून छेड काढली जाते. यामुळे भीतीने अनेक जणी पालकांना आणि पोलिसांनाही घडला प्रकार सांगत नाहीत. यामुळे टवाळखोरांचे धाडस वाढते. छेड काढल्यावरही कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून टवाळखोरांची हिंमत वाढते. पुढे ही छेडछाड मोठ्या गुन्ह्यात परावर्तीत होते. यामुळे संबंधित पीडिता आणि छेडखानी करणारा टवाळखोर या दोघांचे कुटुंब वेठीस धरले जाते. या घटनेचा परिणाम केवळ संबंधित दोन कुटुंबावरच होतो, असे नव्हे तर, पोलीस यंत्रणा आणि तपासाच्या अनुषंगाने संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींच्याही कुटुंबावर होतो. एवढी संपूर्ण यंत्रणा एकाच घटनेमुळे कामाला लागते. याशिवाय प्रकरण न्यायालयात गेल्यावर निर्णयासाठी कामकाज अनेक वर्षे चालते ते वेगळेच. या प्रकारावर किमान नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाने संभाव्य पीडितांसाठी उपलब्ध करून दिलेला संपर्क क्रमांक आता लाख मोलाचा ठरणार आहे. या आपत्कालीन मदतीसाठीच्या संपर्क क्रमांकाचा लाभ घेणाऱ्या पहिल्या आठ ते दहा जणी या अन्य पीडितांचे धाडस वाढविणाऱ्या ठरणार आहेत. यामुळेच पोलीस अधीक्षकांनी रक्षाबांधनाचे औचित्य साधून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने डायल ११२ क्रमांक जाहीर केला आहे. या संपर्क क्रमांकाचा सुरक्षित वापर करण्यासंदर्भात चित्रिकरणासह जनजागृती करण्यात येत आहे.
महिला, युवती शाळा, महाविद्यालय, नोकरी, बस स्थानक, व्यवसाय, प्रवासात, बाजारपेठेत तसेच गर्दीच्या ठिकाणी वावरताना टवाळखोरांकडून त्यांची छेडछाड करणे, गैरवर्तन, पाठलाग अशा घटना घडतात. अशा कोणत्याही प्रकारचा धोका किंवा छेडछाड झाल्यास महिला आणि युवतींनी घाबरुन न जाता तत्काळ पोलिसांची मदत मिळविण्यासाठी आपल्याकडील मोबाईलवरून ११२ हा क्रमांक डायल करायचा आहे. पीडितेने या क्रमांकावर संपर्क करताच अवघ्या काही मिनिटातच नजीकच्या पोलीस ठाण्याचे दामिनी पथक घटनास्थळी पोहचेल. आणि टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई करेल. यासंदर्भातील जनजागृतीपर चित्रफितीचे चित्रिकरण पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सुचनेवरून उपअधीक्षक सागर देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, अमितकुमार बडगुजर, एमयूडी एंटरटेन्मेंट प्रोडक्शनचे किरण माने आणि धुळे जिल्ह्यातील स्थानिक कलाकार तसेच दामिनी पथक यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे.