scorecardresearch

वृद्ध महिला डॉक्टरला ११ लाखांना गंडा

संशयितांनी वेळोवेळी संपर्क साधत वृद्ध डॉक्टरला कोटक मिहद्रा बँकेतील एका खात्यात रोख रक्कम भरण्यास भाग पाडले.

वृद्ध महिला डॉक्टरला ११ लाखांना गंडा
संग्रहित छायचित्र

नाशिक : सामाजिक संस्थेला देणगी दिल्याने लंडन येथून भेटवस्तू पाठविल्याचे भासवत शहरातील ७२ वर्षांच्या डॉक्टर महिलेस संशयितांनी ११ लाखांला गंडविल्याचे उघड झाले आहे. भेटवस्तूच्या खर्चापोटी आभासी प्रणालीन्वये पैसे भरण्यास भाग पाडून ही फसवणूक करण्यात आली. याबाबत गंगापूर रस्त्यावरील वृद्ध महिला डॉक्टरने तक्रार दिली. 

परदेशात वैद्यकीय सुविधा देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून एका महिलेने वृद्ध डॉक्टरशी संपर्क साधला. वृद्धा दानशूर असल्याचे लक्षात आल्यावर संशयित महिलेने समाजमाध्यमातून वृद्धेशी परिचय वाढविला. या काळात संशयित महिलेने संस्थेच्या कामाची माहिती देत वृद्ध महिलेला मे महिन्यात युनियन बँकेच्या खाते क्रमांकावर ३० हजार रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले. देणगी मिळाल्यानंतर संबंधित महिलेच्या संस्था प्रमुखाने वृद्धेशी संपर्क साधला. डॉ. अ‍ॅलेक्स नामक प्रमुखाने संस्थेस मदत केल्याबद्दल आभार मानले. यावेळी लंडन येथून भेटवस्तू पाठवीत असल्याचे भासवून संशयितांनी वेळोवेळी संपर्क साधत वृद्ध डॉक्टरला कोटक मिहद्रा बँकेतील एका खात्यात रोख रक्कम भरण्यास भाग पाडले. अशा प्रकारे वृद्धेची ११ लाख २३ हजार रुपयांना फसविण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आमिष दाखविणाऱ्यांसह पैसे वर्ग करण्यात आलेल्या बँक खातेधारकांविरुद्ध फसवणूक आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिटीलिंकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर सिटीलिंक बसने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. जुने सीबीएस भागातून रात्री ५५ वर्षांची व्यक्ती पायी जात असताना त्याला महापालिकेच्या भरधाव सिटीलिंक बसची धडक बसली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार पी. एम. धारणकर यांनी तक्रार दिली. त्यावरून चालक गोविंद थोरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसमध्ये चढताना दागिन्यांची चोरी

शहरातील स्थानकांमध्ये चोरीच्या घटना वाढत असून पतीसमवेत बाहेरगावी जाणाऱ्या महिलेच्या पर्समधून सुमारे दोन लाखांचे दागिने चोरटय़ांनी लांबविले. महामार्ग स्थानकात हा प्रकार घडला. याबाबत जानकीराम दुसाने (ठाणे) यांनी तक्रार दिली.

दुसाने दाम्पत्य नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. परतीच्या प्रवासासाठी महामार्ग स्थानकात नाशिक- ठाणे बसमध्ये चढत असताना गर्दीत चोरटय़ांनी दुसाने यांच्या पत्नीच्या खांद्याला अडकविलेली पर्स उघडून दागिन्यांची प्लास्टिक डबी चोरून नेली. त्यात मंगळसूत्र, अंगठय़ा असे सुमारे एक लाख ९४ हजार रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

श्रमिकनगर भागात झालेल्या घरफोडीत सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास झाला. याबाबत सचिन बुटाले (आयटीआय कॉलनी) यांनी तक्रार दिली. बुटाले कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील तिजोरीतून रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख चार हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या