नाशिक : पावसाने विश्रांती घेतल्याने दैनंदिन कामे सुरळीत होत असतांना मंगळवारी जुने नाशिक भागात एक जुना वाडा कोसळला. कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी एक रिक्षा आणि दोन दुचाकी वाड्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
जुने नाशिक हा लहान गल्ल्या आणि जुन्या वाड्यांचा परिसर. जुन्या नाशिकची ओळखच वाड्यांमुळे आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने दरवर्षी धोकादायक वाड्यांना नोटीस बजावण्यात येते. त्याप्रमाणे ती यंदाही देण्यात आली. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चौक मंडई परिसरातील एक जुना वाडा अचानक कोसळला. वाड्याचा मोठा भाग हा त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दोन दुचाकींसह रिक्षावर पडला. त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
मालक आधीच वाडा सोडून बाहेर गेल्याने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती देताच पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर वझरे रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने मदतकार्यात अडथळे आले. परिसरात अनेक धोकादायक वाडे आहेत. महापालिकेच्या वतीने वाडा मालकांना नोटीस देत धोकादायक भाग पाडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर सायंकाळी उशीरापर्यंत मदतकार्य सुरू होते. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्यात येत होता. या अपघातामुळे धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून महापालिका प्रशासन आगामी कुंभमेळा तसेच पुढील काळात याविषयी कोणती पाऊले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शाही मिरवणूक मार्ग तसेच गोदाकाठाकडे येणारे रस्ते, परिसरातील अतिक्रमण, धोकादायक वास्तु, वाडे यांची खासगी कंपनीकडून पाहणी करण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून धोकादायक वाड्यांची, गोदाकाठावरील पुलांची माहिती संकलित करुन उपाययोजना करण्यात येणार आहे.
जून महिन्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने धोकादायक इमारती, वाडे यांना घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. शहरात ७०० पेक्षा अधिक धोकादायक वाडे आहेत. वाडा मालकांची उदासिनता, भाडेकरुंचा हलगर्जीपणा, यामुळे महापालिका प्रशासनही हतबल झाले आहे.