लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: समाज माध्यमांत रमलेल्या लोकांच्या बेसावधतेचा फायदा घेत अनेकांची इ माध्यमातून आर्थिक, शारीरिक फसवणूक होत आहे. ही गुन्हेगारी थांबविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यामुळेच नाशिक शहर पोलीस सायबर शाखेच्या वतीने इंटरनेटचा सुरक्षित रित्या वापर करण्यात यावा, यासाठी सायबर दूत हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

सध्या अत्याधुनिक भ्रमणध्वनींचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा भ्रमणध्वनींमध्ये वेगवेगळे पर्याय असल्याने अनेक जण त्यांचा वापर करण्याकडे आकर्षित होत आहेत. घरबसल्या आर्थिक व्यवहार, वस्तू खरेदी यासह अनेक कामासाठी, आवश्यक माहिती मिळविण्यासाठी याशिवाय अन्य काही कामांसाठी भ्रमणध्वनीचा वापर होत आहे. मात्र याचा वापर योग्य पध्दतीने न झाल्यास अनेकांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. शहर परिसरातून दिवसात २५ हून अधिक तक्रारी याविषयी फसवणूक झाल्याच्या प्राप्त होत आहेत. बऱ्याचदा फेसबुकवरून महिलेच्या नावाने मैत्रीसाठी विनंती केली जाते. ती स्विकारल्यानंतर व्हॉट्स अप क्रमांक मागितला जातो.

हेही वाचा… नाशिक: होळकर पुलाखालील यांत्रिकी दरवाजाचे काम लवकरच; बंधाराही हटविणार; गोदावरीतील पाणी फुगवटा कमी करण्यासाठी निर्णय

अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरून व्हिडिओ संदेश केला जातो. त्या व्हिडिओ संदेशातून दुसऱ्या बाजूने अश्लिल चित्रफित दाखवली जाते. त्याचवेळी व्हिडिओ संदेश मुद्रित केला जातो. त्याआधारे पैशांची मागणी केली जाते. काही वेळा एखाद्या उत्पादनाची जाहिरात करुन, नोकरीचे आमिष दाखवित, अशा वेगवेगळ्या कारणाने नागरिकांना आकर्षित केले जाते. या माध्यमातून वेगवेगळी कारणे देत त्यांच्या फसवणुकीला सुरूवात होते. बऱ्याचदा हे सराईत गुन्हेगार परप्रांत, परदेशात असतात. अशा प्रकारे ई माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर दूत हा अनोखा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

हेही वाचा… नाशिक: अनधिकृत नळजोडणीधारकांना अभय; जोडणी अधिकृत करण्याची मुभा; पाणीपट्टीचे उत्पन्न वाढविण्यासाठी धडपड

या माध्यमातून सायबर गुन्हेगार विविध युक्त्या वापरुन नागरिकांची कशा प्रकारे फसवणूक करतात, ते कसे टाळावेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रबोधनापासून सुरूवात होणार आहे.

सध्या समाज माध्यमांचा वापर आणि इंटरनेटचा वापर सर्वच नागरिक करत आहेत. मात्र समाज माध्यमांचा सुरक्षित वापर करणे आवश्यक आहे. आपल्याकडे हे प्रमाण केवळ पाच ते दहा टक्के आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या वापरत नागरिकांची फसवणूक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा निर्माण व्हावी, यासाठी सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात सायबर दूत म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात सर्वच घटकांतील नागरिकांना याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. – प्रशांत बच्छाव ( पोलीस उपायुक्त-गुन्हे)