नाशिक : येवला तालुक्यातील कासारखेडा आणि बाभुळगाव या शिवारांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका चालकाचा मृत्यू तर, दोन जण गंभीर जखमी झाले. गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर कासारखेडा शिवारात पेट्रोल टँकर आणि ट्रेलर यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. जखमीला येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर टँकर उलटल्याने पेट्रोल गळती सुरू झाली होती. त्यामुळे तालुका पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग काही काळ बंद ठेवला. मनमाडजवळील पानेवाडी येथून हिंदुस्तान पेट्रोलियम प्रकल्पातील पथकाने घटनास्थळी धाव घेत पेट्रोल गळती बंद केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा…नादुरुस्त रिक्षाला पुढे नेणाऱ्या सिटीलिंकच्या चालक-वाहकांचे निलंबन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरा अपघात बुधवारी मध्यरात्री अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर बाभुळगाव शिवारात झाला. मोटार आणि कंटेनर यांची धडक होऊन मोटार चालक शांतीलाल पावरा (रा. शिरपूर) यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असलेला शेरसिंग पावरा (रा. बेलवाडी) हा गंभीर जखमी झाला. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. येवला शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.