नाशिक : गोव्यातून मद्य तस्करी करुन पुरवठा करणारा शहरातील हस्तकास अटक करण्यात आली असून आतापर्यंत ६६ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. गोव्यात निर्मित मद्याचे ४४८ खोके (किंमत अंदाजे ४३ लाख रुपये) मालवाहतूक वाहनातून जप्त करण्यात आल्यावर संशयित पद्मसिंग बजाज हा गोवा राज्यातून मद्यसाठा मुंबई-आग्रा महामार्गाने गुजरात राज्यात घेवून जाणार असल्याचे तपासात उघड झाले होते.

बजाजकडे अधिक चौकशी केली असता त्याने मद्यसाठा गोव्यातील महेश शेठ आणि बिलाल यांच्या सांगण्यावरून नाशिक येथील फिरोदिया शेठ यांच्या मार्फत त्यांच्या आर्या ट्रान्सपोर्टकडील वाहनातून गुजरात राज्यात राजु शेठ यांच्याकडे पाठविण्यात येणार होता, असे सांगितले. यातील मुख्य संशयितांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक गोवा आणि राजस्थानला रवाना करण्यात आले.

हेही वाचा…काँग्रेस नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा- कर्नाटक महामार्गावर सतत तीन दिवस पाळत ठेवत मद्याचा पुरवठा करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यातील संशयित महेश तन्ना (रा. गुजरात) हा सध्या गोव्यात राहत असून तेथून मद्य पुरवठा करतो. बिलाल उर्फ अदनान मन्सुरी (रा. गुजरात) हा गोव्यातून मद्य तस्करी करतो. यातील संशयित आशिष फिरोदिया यास नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातून ताब्यात घेतले. आतापर्यंत या कारवाईत ६६ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.