दुष्काळात शेतकऱ्यांसमोर नवीन संकट
उन्हाळ (गावठी) कांद्याची आवक वाढत असताना भाव नीचांकी पातळी गाठत असल्याने या हंगामात नफा दूर उलट उत्पादन खर्चदेखील भरून निघणे अवघड झाल्याची स्थिती ऐन दुष्काळात शेतकऱ्यांवर ओढवली आहे. सर्वसाधारणपणे एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी हजार ते बाराशे रुपये खर्च येतो. महिनाभरापासून उन्हाळ कांद्याला सरासरी केवळ ७५० रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. हे समीकरण पाहिल्यास नफ्याऐवजी नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. देशांतर्गत उन्हाळ कांद्याचे विपुल उत्पादन झाल्यामुळे पुढील काही महिने या स्थितीत फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविल्याने यंदा शेतकऱ्यांचे हात पोळले जाणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांत कांदा हे भावाच्या दृष्टीने बेभरवशाचे पीक बनले आहे. जेव्हा त्याचे भाव किलोला शंभर रुपयांवर जातात, तेव्हा त्याचा लाभ शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना अधिक्याने होत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. तथापि, जेव्हा नुकसान सहन करण्याची वेळ येते, तेव्हा शेतकरी हा एकमेव घटक असतो.
वर्षभरात खरीप (पोळ), लेट खरीप (रांगडा) आणि उन्हाळ (गावठी) या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी खरीप (पोळ) कांद्याला सरासरी दोन हजार ते अडीच हजार आणि रांगडय़ाला साधारणत: १५०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाल्याने उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी सर्वाची अपेक्षा होती. यामुळे नेहमी या पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर गहू व इतर पिके घेणाऱ्यांनीही आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळविला. महाराष्ट्रात ही स्थिती असताना मध्य प्रदेश, गुजराथ, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी भागातही उन्हाळ कांद्याचे मुबलक उत्पादन झाले. त्या सर्वाची परिणती या हंगामात थोडे थोडके नव्हे तर तब्बल ११० मेट्रिक टन उत्पादनात होणार आहे.
वास्तविक, उन्हाळ कांद्याचे आयुर्मान इतर कांद्यांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे त्याची साठवणूक करता येते. एप्रिलपासून सुरू होणारा कांदा सप्टेंबर व कधी कधी ऑक्टोबपर्यंत बाजाराची गरज भागवितो. चांगल्या दर्जाच्या मालाची साठवणूक सुरू झाली असली तरी कांद्याला मिळणारा भाव लक्षात घेतल्यास त्यातून शेतकऱ्याच्या हाती काही पडणार नसल्याचे दिसून येते. कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजार समितीत मंगळवारी कांद्याला सरासरी ७५० रुपये भाव मिळाला. महिनाभरापूर्वी उन्हाळ कांद्याची दर पातळी सरासरी ८०० रुपयांवर होती. महिनाभरापासून या बाजारात दररोज ६०० ते ७०० टेम्पो, ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी येत आहे. जिल्ह्य़ातील अन्य बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. प्रति क्विंटलला जो भाव जाहीर होतो, त्यातून वाहतूक खर्च, हमाली, तोलाई आदी तत्सम ८० ते ९० रुपये खर्च वजा होतो. म्हणजे प्रत्यक्षात जाहीर भावाहून कमी रक्कम शेतकऱ्याच्या हाती पडते. कष्ट करूनही चार पैसे न मिळाल्यास शेतकरी तोटय़ाचा धंदा किती दिवस करू शकतो, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
नैसर्गिक संकटांचा सामना करावा न लागल्यास साधारणत: एक एकर क्षेत्रात ६० ते ६५ क्विंटल कांद्याचे उत्पादन होते. उत्पादनाचा संपूर्ण खर्च आणि श्रम विचारात घेतल्यास शेतकऱ्यांना प्रति किलोसाठी १० ते १२ रुपये खर्च येतो.
म्हणजे, प्रति क्विंटल कांद्याचा उत्पादन खर्च निव्वळ १००० ते १२०० रुपयांच्या घरात आहे. सध्या बाजारात प्रति क्विंटल कांद्याला केवळ ७५० रुपये भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जबाजारी होण्याशिवाय कोणतेही गत्यंतर नसल्याचे तज्ज्ञांनी सूचित केले.

पुढील काळातही नुकसान ठरलेले
साठवणूक केलेला उन्हाळ कांदा पुढील पाच महिने देशाची गरज भागवीत असतो. या काळात देशाची कांद्याची गरज आहे ५० ते ५५ लाख टन. या काळात सात ते आठ टन कांदा निर्यात होऊ शकतो. साठविलेला १० टक्के कांदा खराब झाल्याचे मानले तरी ही सर्व गोळाबेरीच ७० टनापर्यंत जाते. म्हणजे देशाची कांदा गरज, निर्यात आणि खराब होण्याचे प्रमाण गृहीत धरूनही देशात ३० ते ४० टन अतिरिक्त राहणार आहे. या एकंदर स्थितीमुळे पुढील काळात कांदा भावात सुधारणा होण्याची शक्यता नाही.
– चांगदेवराव होळकर (माजी उपाध्यक्ष, नाफेड)

गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात वाढ
नाशिक, महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या सर्व राज्यांत कांद्याचे पीक उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होणार आहे. सर्वत्र काढणी सुरू झाली असून त्याची साठवणूक सुरू झाली आहे. या हंगामात देशात ४५ लाख मेट्रिक टन कांदा चाळीमध्ये साठविला जाईल. २०१५-१६ या संपूर्ण वर्षांत देशात १२ लाख हेक्टर क्षेत्रावर २०३ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होईल. गतवर्षीच्या तुलनेत हे उत्पादन अधिक आहे. सध्या एकाच वेळी बाजारात मोठय़ा प्रमाणात माल येत असल्याने कांद्याचे भाव घसरलेले आहे. तथापि, त्यातून उत्पादकांचे नुकसान होत नसून त्यांना अल्प प्रमाणात नफा मिळत आहे. दीड महिन्यानंतर कांदा बाजारातील भाव सुधारलेले पाहावयास मिळतील.
– राष्ट्रीय फलोत्पादन विकास व संशोधन प्रतिष्ठान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.