गुजरातच्या सिमेजवळ असणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील ५५ हून अधिक गावांना जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधातंर्गत स्मशानभूमीसाठी निधी देण्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती. त्यानुसार, प्रशासनाकडे १२२ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचा प्रस्ताव दाखल झाला असला तरी प्रत्यक्षात जनसुविधातंर्गत केवळ २२ गावातील स्मशानभूमीसाठी एक कोटी, ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. १०० गावांना पुन्हा एकदा स्मशानभूमीसाठी निधीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा >>>नाशिक : जिंदाल कंपनीतील आग २४ तासानंतर नियंत्रणात; दुर्घटनेच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची समिती
सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागातील गावांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने ही गावे गुजरातला जोडण्याची मागणी करण्यात येत होती. तूर्तास या वादावर पडदा पडला असला तरी या भागातील गावांना अनेक सुविधा नसल्याचे वास्तव आहे. सुरगाणा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमी नाही. त्यामुळे पावसाळ्यात जंगलात कुठेतरी ताडपत्री किंवा झाडांच्या पालांचा छतासारखा उपयोग करुन अग्निडाग देण्यात येतो. पालकमंत्री भुसे यांनी या गावांना स्मशानभूमीसाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. जनसुविधातंर्गत तालुक्यात फक्त २२ स्मशानभूमींसाठी एक कोटी, ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अन्य १०० गावांना स्मशानभूमीसाठी अजूनही प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा >>>विशाल रांगोळीव्दारे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन; मुंजवाड विद्यालयाची कामगिरी
दुसरीकडे जनसुविधातंर्गत जिल्ह्यातील १५ तालुक्यासाठी ४२.३३ कोटींच्या ४२८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात पालकमंत्री भुसे यांच्या मालेगावला झुकते माप देण्यात आले आहे. जिल्ह्यात ४६१ गाव,पाड्यांना स्मशानभूमी नसून त्यातील १२२ गावे सुरगाणा तालुक्यातील आहेत. पालकमंत्री भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात ६५ स्मशानभूमींसाठी चार कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. साधारण स्मशानभूमी तथा स्मशानभूमीसंदर्भात अनुषंगिक कामांसाठी सरासरी १० लाख तर, काही स्मशानभूमींसाठी १५ लाख, सात लाख, पाच लाख रुपये याप्रमाणे निधी मंजूर झालेला आहे.