४५ वर्षांपुढील केवळ २३.३७ टक्के जणांचे लसीकरण

नाशिक : लस तुटवडय़ामुळे मध्यंतरी १८ ते ४४ वयोगटाचे सुरू झालेले लसीकरण थांबविले गेले असले तरी त्यामुळे ४५ वर्षांपुढील वयोगटाच्या लसीकरणास अपेक्षित वेग मात्र मिळाला नसल्याचे चित्र विभागात दिसत आहे. अक्षरश: रडतखडत चाललेल्या लसीकरणामुळे आतापर्यंत संपूर्ण विभागात केवळ २३.३७ टक्के अर्थात १५ लाख १२ हजार ३२० व्यक्तींना पहिली अथवा दोन्ही मात्रा देणे शक्य झाले आहे. यात नाशिक जिल्ह्यात २५.३६ टक्के, तर धुळे जिल्ह्यात सर्वात कमी २१.१३ टक्के लसीकरण झाले आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार विभागात ४५ वयोगटापुढील ६४ लाख ७१ हजार २०८ व्यक्ती आहेत. त्यातील १५ लाख १२ हजार ३२० जणांचे लसीकरण झाले असून याच वयोगटातील जवळपास ७८ टक्के नागरिकांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. जिल्हानिहाय विचार करता नाशिक जिल्ह्यात २१ लाख ८६ हजार ६९७ पैकी पाच लाख ५४ हजार ५७० (२५.३६ टक्के), नंदुरबार जिल्ह्यात सहा लाख १३ पैकी एक लाख ३५ हजार ९६ (२२.५२), जळगावमध्ये १४ लाख ३९ हजार २८५ पैकी तीन लाख चार हजार १६८ (२१.१३), धुळे जिल्ह्यात सात लाख २२ हजार ८१५ पैकी एक लाख ६९ हजार ३२५ (२३.४३) आणि नगर जिल्ह्यात १५ लाख २२ हजार ३९९ पैकी तीन लाख ४९ हजार १६१ व्यक्तींचे लसीकरण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

तुटवडय़ामुळे नाशिक जिल्ह्यात बुधवारी लसीकरण बंद ठेवावे लागले होते. या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात एकाही व्यक्तीला लस दिली गेली नाही. विभागातील उर्वरित जिल्ह्यात दिवसभरात केवळ सात हजार २११ व्यक्तींना लस दिली गेली. विभागात आजवर ज्या ज्या घटकांचे लसीकरण झाले त्यातील १८ लाख १६ हजार १०१ जणांना पहिली मात्रा दिली गेली. तर दुसरी मात्रा घेतलेल्यांची संख्या पाच लाख ७२ हजार ४१० इतकी आहे. म्हणजे जवळपास १२ लाख व्यक्तींना दुसरी मात्रा मिळणे बाकी असल्याचे आरोग्य उपसंचालकांच्या अहवालावरून दिसून येते.

दोन लाख ९१ हजार मात्रा शिल्लक

पुरेशी लस नसल्याने केंद्रांसह व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा आणण्याची वेळ येत असताना आरोग्य विभागाच्या अहवालात विभागात सद्य:स्थितीत दोन लाख ९१ हजार ७६७ मात्रा शिल्लक असल्याचे म्हटले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ९३४१४, नंदुरबार ३६३४७, जळगाव १२८८२, धुळे ४६१३० आणि नगर जिल्ह्यात १०३२९४ लस मात्रांचा समावेश आहे.