नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुन्हा एकदा वेगवान कार्यक्षमतेने २०२४ -२५ च्या शैक्षणिक उन्हाळी परीक्षांचे निकाल अवघ्या ३० दिवसांच्या आत जाहीर केले आहेत. एकूण ११३ शिक्षणक्रमातील सुमारे पावणेपाच लाख विद्यार्थ्यांच्या २७ लाखहून अधिक उत्तरपत्रिका राज्यातील १०९ ऑनलाईन मूल्यमापन (कॅप) केंद्रांवर आधुनिक पद्धतीने तपासण्यात आल्या.
विद्यापीठातर्फे २७ मे ते १६ जून २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या परीक्षांचे संपूर्ण निकाल अलीकडेच जाहीर करण्यात आले. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसाय करत असल्याने, त्यांच्या सोयीसाठी परीक्षा केवळ २० दिवसांच्या कमी कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. या जलद परीक्षा आयोजनानंतरही, विद्यापीठाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि परीक्षा विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे वेळेत निकाल देण्याची आपली परंपरा कायम ठेवली. यंदाच्या उन्हाळी परीक्षेत ११३ शिक्षणक्रमांसाठी, २७९ सत्रनिहाय परीक्षांना एकूण चार लाख ६७ हजार ४४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. महाराष्ट्रातील ५७९ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन आणि गोपनीय पद्धतीने १३४३ प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचवून परीक्षा सुरळीत पार पडल्या. एकूण नोंदणी झालेल्या २७ लाख २४ हजार ९४२ उत्तरपत्रिकांपैकी परीक्षा झाल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांच्या २३ लाख ५० हजार ३१८ उत्तरपत्रिका तपासून वेळेत निकाल लावण्याचे मोठे आव्हान होते. ते लिलया पेलण्यात आले. या प्रक्रियेत विद्याशाखा संचालक, आठही विभागीय केंद्रांवरील विभागीय संचालक, त्यांचे कर्मचारी तसेच परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शनही वेळेत निकाल जाहीर करण्यात महत्त्वाचे ठरले. या सर्व परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.
आव्हान कसे पेलले
या आव्हानाचा सामना करण्यासाठी विद्यापीठाने अत्याधुनिक स्कॅनिंग पद्धतीचा अवलंब केला. तसेच राज्यातील १०९ ऑनलाईन मूल्यमापन (कॅप) केंद्रांवर नियुक्त परीक्षकांची बायोमेट्रिक आणि चेहरा पडताळणी तंत्रज्ञानाच्या आधारे ओळख पटवून, ऑनस्क्रीन डिजिटल मूल्यमापन पद्धतीने उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन तातडीने पूर्ण करण्यात आले.