नाशिक: पदोन्नतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची तांत्रिक पदवी (बी.टेक) आणि पदविका संजय खाडे आणि त्यांचे इतर दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी मुक्त विद्यापीठाची तांत्रिक पदवी व पदविका या ग्राह्य धरता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) दिला आहे.

आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ) केंद्रात सहायक अभियंता पदावर संजय खाडे आणि इतर दोन जणांना प्रसारभारतीने पदोन्नतीसाठी मुक्त विद्यापीठाची बी.टेक. पदवी ग्राह्य नसल्याचे कारण देत पदोन्नती नाकारली होती. या विरोधात संबंधितांनी कॅटकडे दाद मागितली. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणचे (कॅट) सदस्य (न्यायिक) हरविंदर कौर ओबेरॉय आणि सदस्य (प्रशासकीय) श्रीकृष्ण यांच्या खंडपीठाने केंद्र शासन व राज्यांच्या कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या मुक्त विद्यापीठांच्या तांत्रिक पदवी व पदविका या ग्राह्य धरता येतील, असा निर्वाळा दिला. तसेच या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देण्यात यावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा… नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी यांचा रोड शो

केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे नोकर भरतीत अशा पदव्या ग्राह्य असतील तर बढत्यांसाठीही या पदव्या ग्राह्य धरायला हव्यात. बी. टेक. पदवी शिक्षणक्रमात पुस्तकी शिक्षणासह प्रात्यक्षिक शिक्षणही मुक्त विद्यापीठात दिले जाते, ही बाब ग्राह्य धरून कॅटने हा निर्णय दिला आहे. मुक्त विद्यापीठाच्या वतीने ॲड. नितीन गवारे पाटील यांनी बाजू मांडली. या निकालाचा लाभ विविध शासकीय आस्थापनांमधील कार्यरत मुक्त विद्यापीठाची बी. टेक. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना होणार आहे.