जळगाव – जावई प्रांजल खेवलकर विरोधात बोलणाऱ्या रूपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप होत असताना, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या व्यंगचित्राला जळगावमध्ये शाई फासून तीव्र निषेध केला. या सर्व घडामोडीत चाकणकरांसाठी भाजप मैदानात उतरली असताना, अजित पवार गटाने मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
प्रांजल खेवलकर यांच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या भ्रमणध्वनीमधून महिलांसोबतच्या चॅटचे स्क्रिनशॉट, नग्न व अर्धनग्न छायाचित्रे तसेच काही अश्लील चित्रफिती सापडल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत वातावरण आणखी तापवले आहे. विशेषतः शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना चाकणकरांनी लक्ष्य केले आहे. चाकणकरांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी आपल्या जावयाच्या बाजूने भूमिका घेतली. तुम्ही बोलता त्यावरून असे वाटते की तुम्हीच चौकशी अधिकारी आहात, असा टोला त्यांनी हाणला. पुढे बोलताना खडसे यांनी चाकणकर यांचा संताप हा वैयक्तिक कारणांमुळे असल्याचे म्हटले.
खडसेंच्या मते रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे अतिशय जवळचे व मैत्रीपूर्ण (?) संबंध असल्याचे सर्वांना माहीत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक रंगवला जात आहे. दरम्यान, चाकणकर यांच्याविषयी बोलताना एकनाथ खडसे यांची जीभ घसरली. त्यांच्याविषयी त्यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे खडसेंनी चाकणकर यांची जाहीर माफी मागावी. महिलांचा अपमान अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशा घोषणा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जळगाव शहरात शुक्रवारी दिल्या. प्रसंगी भाजप महिला पदाधिकारींनी एकनाथ खडसे यांच्या व्यंगचित्राला शाई फासली. भाजपच्या आंदोलनात खडसेंनी एकेकाळी संधी दिल्याने मोठे झालेले काही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते.
या सर्व घडामोडी बघता चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या असताना भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी एकनाथ खडसेंच्या व्यंगचित्राला शाई फासली. प्रसंगी खडसेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. आश्चर्य म्हणजे चाकणकरांच्या समर्थनार्थ खडसेंचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपचा आटापिटा चाललेला असताना, त्याठिकाणी अजित पवार गटाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. वास्तविक, शरद पवार गटातील अनेक दिग्गजांनी प्रवेश केल्याने जळगावमध्ये अलिकडच्या काळात अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. परंतु, पक्षाच्या नेत्यांसाठी भाजप पेटून उठल्यावर अजित पवार गटाने निव्वळ बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.