जळगाव : पाचोऱ्यात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार किशोर पाटील यांनी थेट आव्हान दिल्यानंतर भाजपच्या वतीने माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सौभाग्यवती सुचेता पाटील शनिवारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपने शहरात मोठी फेरी काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढल्यानंतर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील संवाद आणि समन्वय चांगला होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम जवळ येताच तिन्ही पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. विशेषतः भाजपने बऱ्याच ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याची आणि सोयीने युती करण्याची भूमिका घेतल्याने शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, भाजपवर अविश्वास व्यक्त करून शिंदे गटाचे पाचोऱ्यातील आमदार किशोर पाटील यांनी यापूर्वीच स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांना शह देण्यासाठी शिंदे गटानेही आता आमदार पाटील यांना मोठी जबाबदारी आता सोपवली आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रभारींची नियुक्ती करताना शिंदे गटाने आमदार पाटील यांच्याकडे पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर नगर परिषदांसह शेंदुर्णी नगर पंचायतीची सूत्र दिली आहेत. आधीच आमदार पाटील यांच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. त्यात त्यांचे शिंदे गटात राजकीय वजन वाढल्याने भाजपच्या गोटात आणखी खळबळ उडाली आहे.

कोणत्याही परिस्थितीत पाचोरा नगर परिषदेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने कोणतीही कसर ठेवलेली नाही. त्याची प्रचिती शनिवारी भाजप उमेदवार सुचेता पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आली. भाजपने शहरात मोठी फेरी काढून नागरिकांचे लक्ष वेधले. या प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी तसेच अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, डी. एम. पाटील, प्रताप पाटील, संजय वाघ, मधुकर काटे, दीपक माने आदींसह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनिता पाटील यांचाही उमेदवारी अर्ज

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या सौभाग्यवती सुनिता पाटील यांनीही शनिवारी नगराध्यक्षपदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे गटाच्या उमेदवार सुनिता पाटील या सोमवारी आणखी दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या दिवशी शिवसेनेचा शिंदे गट पाचोरा शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.