जळगाव – जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशीला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात पपई पिकाची लागवड केली आहे. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे वाढलेल्या रोग व कीडींच्या प्रादुर्भावाने संबंधित सर्व पपई उत्पादक शेतकरी आता संकटात सापडले आहेत. विशेषतः विषाणूजन्य रोगांनी पपई पिकाचे अतोनात नुकसान केले असताना उत्पादनातही सुमारे ५० ते ६० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

श्रावण महिन्यामुळे जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या पपईला उत्तर भारतातील राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश या भागातून सध्या चांगली मागणी आहे. मागणीनुसार फळांची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांना पपईसाठी २० ते २४ रुपयांपर्यंतचा दर व्यापाऱ्यांकडून शेतात मिळू लागला आहे. किरकोळ बाजारातही पपईचे दर ४० रूपयांपेक्षा जास्त आहेत.

अशा स्थितीत शेतकरी पपई पिकाकडे मोठ्या आशेने पाहत असताना नेमका विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळ्यात पपईचे पीक जगविले. रोपांसह आंतरमशागत, रासायनिक खते आणि किटकनाशकांवर भरमसाट खर्च केला. आता उत्पादन हाती येण्याची वेळ झाल्यावर व्हायरसने पाय पसरल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

सततच्या ढगाळ वातावरणामुळे पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास पपईमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य रोग येऊ शकतात. त्यापैकी पपई रिंगस्पॉट व्हायरस पपईच्या झाडांना आणि फळांना नुकसान पोहोचवितो. याशिवाय, लीफ कर्ल आणि पिवळा मोझॅक व्हायरस पपई पिकावर विपरीत परिणाम करतो. त्यापैकी पिवळ्या मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यास पपईच्या पानांवर पिवळे ठिपके किंवा डाग दिसतात आणि पानांचा आकार बदलतो. हा रोग प्रामुख्याने पानांमधील रस शोषणाऱ्या मावा किडींद्वारे पसरतो.

मावा कीड संक्रमित झाडाचा रस शोषून घेतल्यानंतर निरोगी झाडांवर जाऊन बसतात. ज्यामुळे पपई पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा वेगाने प्रसार होतो. पानांवर पिवळे तसेच अनियमित आकाराचे ठिपके किंवा डाग दिसू लागतात. पाने आकसतात आणि त्यावर पिवळ्या-हिरव्या रंगाचे थर येतात. संक्रमित झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. ती बुटकी राहून जातात. ही सर्व लक्षणे जिल्ह्यातील पपई पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरसवर उपाययोजना काय ?

व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रथम पपई पिकावरील मावा कीडींचे नियंत्रण आवश्यक आहे. यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करणे अधिक फायद्याचे ठरू शकते. रोगग्रस्त झाडे त्वरित काढून टाकल्यास विषाणूचा प्रसार थांबविता येतो. निरोगी आणि रोगमुक्त बियाणे आणि रोपांचा वापर केल्यास पिकाला रोगांपासून वाचवता येते. पिकांची फेरपालट केल्यास जमिनीतील विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो. रोगप्रतिकार क्षमता चांगली असल्यास पपईचे पीक सहसा रोगाला बळी पडत नाही. विषाणूजन्य रोगांवर रासायनिक उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक फायदेशीर असते, असा सल्ला जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हेमंती बाहेती यांनी दिला आहे.